प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 19 डिसेंबर 2020 रोजीच्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाच्या निविदेत भ्रष्टाचार करण्याची सर्व तयारी केली असून भाजपचे संघटनमंत्री सतिश धोंड यांच्या सुचनेनुसार एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला सदर कामाचे कंत्राट देण्याचे यापुर्वीच ठरलेले आहे असा दावा दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी केला आहे.
सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या निविदेत, एकंदर कामाची अंदाजे रक्कमच नमुद करण्यात आलेली नाही. वित्त खात्याने अंदाजे रक्कम नसताना सदर निविदेला मान्यता कशी दिली हे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करणे गरजेचे आहे. सदर निविदेतील विविध कामांचा तपशील कोणी व कोणत्या आधारावर तयार केला तसेच सदर तपशील तयार करण्यासाठी सरकारने समितीचे गठन केले होते का व केल्यास समितीवरील सदस्यांना सदर तपशील बनविण्याचा योग्य अनुभव, पात्रता होती का या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यानी देणे गरजेचे आहे अशी मागणी जोसेफ डायस यांनी केली आहे.
या निविदेसाठी केवळ पर्यटन खात्याकडे नोंदणी झालेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीना सहभागी होणार असल्याची अट माहिती खात्याने टाकली आहे. इफ्फीसारख्या मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहभागी होणाऱया कंपनीना बाहेर ठेवण्याचा अधिकार सरकारला कोणी दिली हे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे.
माहिती व प्रसिद्धी खात्याने जारी केलेल्या निविदा पत्रिकेत अनेक अस्पष्टता व तफावती असून, सरकारने जाणीवपूर्वक त्या ठेवलेल्या आहेत जेणेकरुन निवड करण्यात येणाऱया कंपनीला अव्वाच्या सव्वा दराने कंत्राट देण्यास सोपे होणार आहे असा दावा जोसेफ डायस यांनी केला आहे.
सदर निवीदा तसेच तांत्रिक, आर्थिक बोली सादर करण्याची तारीख मंगळवार दि. 15 डिसेंबर 2020 आहे. त्याच दिवशी सर्व कंपनीना कलात्मक सादरीकरण करण्याचे निविदेत म्हटले आहे. एकाच दिवसात या सर्व गोष्टी कशा काय पूर्ण होऊ शकतात असा प्रश्न जोसेफ डायस यांनी विचारला आहे.
गोवा मुक्तीदिनाच्या सदर निविदेत भ्रष्टाचार व घोटाळा असल्याचे स्पष्ट दिसत असून, आपली निवड झाल्यानंतर केवळ तीन दिवसात सर्व कामे पूर्ण करण्याचे अशक्मयप्राय काम सदर कंपनीला करावे लागणार आहे. सरकार सर्व सोपस्कार व नियम बाजूला सारुन एका दिवसातच कामाचा आदेश निवड केलेल्या कंपनीला देणार का असा प्रश्न ही जोसेफ डायस यांनी विचारला आहे.
असंवेदनशील व भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले भाजप सरकार आज गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमावरही माया कमविण्याचा प्रयत्न करीत आहे हे दुर्देवी आहे. गोमंतकीय जनता आज हवालदिल झालेली असताना, कर्जबाजारी झालेले भाजप सरकार 40 टक्के कमिशन खाण्यासाठी सदर कार्यक्रमावर 2.5 ते 3 कोटींची उधळपट्टी करणार आहे असा दावा जोसेफ डायस यांनी केला.
काँग्रेस पक्षाने केलेल्या गौप्यस्पोटाने, भाजप सरकार आता सदर कंपनीला कमी रकमेचे कंत्राट देण्याची शक्मयता असून, कालांतराने अतिरीक्त कामाच्या नावे आडमार्गाने सर्व रक्कम फेडण्याचा प्रयत्न करेल असे सागून, सरकारी अधिकाऱयांनी दबावाला बळी पडून बेकायदेशीर कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास ते त्यांना महागात पडेल असा इशारा जोसेफ डायस यांनी दिला आहे. प्रत्येक कामाचे व्हिडीयो व छायाचित्रीकरण करणे तसेच प्रत्येक वस्तुचे वेगळे बिल ठेवणे हे नियम सर्व अधिकाऱयांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे त्यांनी पूढे म्हटले आहे.
सरकारने सदर निविदा रद्द करावी व 60व्या गोवा मुक्तीदिनाचे सर्व कार्यक्रम केवळ गोमंतकीय कलाकार व संस्था व स्वातंत्र्य सैनिक संघटना यांच्या सहभागानेच करावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.