कार्यकर्ते- पोलीसात झटापट
कोल्हापूर / प्रतिनिधी
नियंत्रण हमारा नाम, प्रदूषण बढाना काम, मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी उद्योग भवनचा परिसर दणाणून सोडला. झूम प्रकल्पावरील विना प्रक्रिया कचरा शेतात पसरल्याच्या प्रकरणावरुन भाजपने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलीसांनी अडवल्याने कार्यकर्ते व पोलीसांत झटापट झाली.
6 जानेवारी 2022 रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेकडे साठलेला व कोणतीही प्रक्रिया न केलेला कचरा कसबा बावडा परिसरातील शेतात पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात अशास्त्रीय पध्दतीने व पर्यावरणाची काळजी न घेता कचरा टाकल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर पाठपुरावा करुनही गेल्या 21 दिवसात प्रदूषण नियंत्रण मंडळांने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे भाजपने टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार विजय जाधव, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजय खाडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते उद्योग भवनसमोर आले. घोषणा देत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे जात असताना पोलीसांनी कार्यकर्त्यांना अडवले.
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे व उप-प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने आंदोलकांना सामोरे गेले. यावेळी आंदोलकांनी कारवाईसाठी विलंब होत असल्याबद्दल जाब विचारला. अखेर कार्यकर्ते कार्यालयास टाळे ठोकण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी कार्यकर्ते व पोलीसांत झटापटही झाली. यामुळे पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात हेमंत आराध्ये, दिलीप मेत्राणी, अजित सूर्यवंशी, अमर साठे, सुनिल पाटील, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, धीरज पाटील, राजाराम परीट, सचिन साळोखे, राजू मोरे, संजय सावंत, आजम जमादार, सुधीर देसाई, सचिन तोडकर, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, मंगला निपाणीकर, विवेक वोरा यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.