गोवा विधानसभेसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज, छाननी व अर्ज मागे घेणे या साऱया प्रक्रिया संपून आता खऱया अर्थाने प्रचाराला जोर चढला आहे. भाजपाने 2022 मध्ये आपले 22 हून अधिक आमदार निवडून येणार असा विश्वास वेळोवेळी व्यक्त केलेला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ही बाब प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवत आहेत. भाजपने यंदा प्रथमच 40 ही मतदारसंघांत उमेदवार उतरविलेले असून त्यात 25 टक्के तिकिटे ही पूर्वाश्रमीच्या काँग्रेसवाल्यांना दिलेली आहेत.
मागील निवडणुकीचा विचार करता हे प्रमाण खूपच वाढले असून 2017 मध्ये भाजपने काँग्रेसमधून फुटून आलेले दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो आणि कुंभारजुवाचे आमदार पांडुरंग मडकईकर या दोघांनाच विजयाचा निकष लावून तिकिटे दिली होती. यावेळी भाजपने पूर्वाश्रमीच्या 10 काँग्रेसवाल्यांना तिकिटे दिलेली असून त्यात नीळकंठ हळर्णकर (थिवी), बाबूश मोन्सेरात (पणजी), जेनिफर मोन्सेरात (ताळगाव), फ्रान्सिस सिल्वेरा (सांत आंद्रे), आंतोनियो फर्नांडिस (सांताप्रुझ), चंद्रकांत कवळेकर (केपे), रवी नाईक (फोंडा), क्लाफासियो डायस (कुंकळ्ळी), सावियो रॉड्रिग्स (वेळ्ळी) आणि जोसेफ सिक्वेरा (कळंगूट) यांचा समावेश आहे
त्याशिवाय भाजपने मागील वेळी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहन खंवटे यांना पर्वरी आणि गोविंद गावडे यांना प्रियोळ मतदारसंघात तिकीट दिले आहे. त्याचप्रमाणे गोवा फॉरवर्डमधून आलेले जयेश साळगावकर यांना साळगावमध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे. 2017 मध्ये स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यानंतर विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील होणारे पहिले आमदार ठरले होते. राणे पोटनिवडणुकीला सामोरे जाऊन भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेसचे दहा आमदार भाजपला येऊन मिळण्याची भरपूर गाजलेली घटना घडली होती.