केपे गट युवक काँग्रेसचा अधिकारग्रहण सोहळा
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे 2700 लोकांचा कोविडने बळी घेतला. ऑक्सिजनचा पुरवठा बंद करुन सरकारने लोकांचे जीव घेतले. सरकारच्या नाकर्तेपणाने मृत्यु आलेल्या शोकाकुल कुटुंबियांवर घरी समई व मेणबत्या पेटवण्याचा प्रसंग आलेला असताना, भाजप सरकारचे मंत्री व पक्षाचे पदाधिकारी दीप प्रज्वलन करुन टीका उत्सव साजरे करतात यावरुन त्यांची असंवेदनशीलता दिसते अशी घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
केपे गट युवक काँग्रेसच्या अधिकारग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, युवक काँग्रेस अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, एल्टन डिकॉस्ता, उबेद खान, मेल्विन कार्वाल्हो, प्रशांत वेळीप व ऍड. अर्चित नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
केपे मतदारसंघातील नगरपालिका व पंचायत क्षेत्रातील सुमारे 350 युवकांतर्फे आज सुमारे 30 जणांनी कोविडची बंधने असल्याने प्रातिनिधीक स्वरुपात युवक काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
गोवा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मागील एक महिना कसलीच जाहिरातबाजी न करता शेकडो कोविड रुग्णांना ऑक्सजिन पुरवठा तसेच इतर मदत करुन लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. फोटो काढून प्रसिद्धी घेण्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांसाठी लोकांचे आशिर्वाद जास्त मोलाचे आहेत हे युवक काँग्रेसने सिद्ध केले असे दिगंबर कामत म्हणाले. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत केपेत काँग्रेसचा झेंडा फडकेल याचा मला पूर्ण विश्वास असल्याचे दिगंबर कामत यांनी उपस्थितांना उद्देशुन केलेल्या भाषणात सांगितले.
भाजप सरकारने आज कोविडच्या संसर्गाने मरण आलेल्यांसाठी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकासाठी चार लाख व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येकी दोन लाख देण्याची घोषणा केली आहे. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोविडने म्त्यु आलेल्या कुटुंबियांना एकुण सहा लाख रुपये सरकारकडून मिळवून देण्यास संपूर्ण मदत करावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना केले.
काँग्रेस पक्षाशी गद्दारी करुन केपेतीलमतदारांचा विश्वासघात करणाऱया उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांना स्वाभिमानी केपेकर धडा शिकविण्यासाठी सज्ज असून, सत्तेत असूनही मागील जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकांत बाबू कवळेकरांच्या समर्थकांची एकुण टक्केवारी जबरदस्त घटल्याने बाबूंचे वजन कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे. संधिसाधू बाबू कवळेकरांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यास सर्व कार्यकर्त्यांनी एकी राखुन काम करावे असे गिरीश चोडणकर म्हणाले.
काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत केपेत एक नवा इतिहास रचणार असून काँग्रेस सोडून भाजपात केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी गेलेल्यांना केपेकर अद्दल घडविणार आहेत असे एल्टन डिकॉस्ता यांनी यावेळी बोलताना सांगितले.
युवक काँग्रेस अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी सर्व नवीन सदस्यांना स्थानिक विषय घेवून जनतेला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. कोविड महामारीत युवक काँग्रेसने केलेल्या कामाने जनता आज आमच्याकडे विश्वासाने पाहत असून, लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे असे ते म्हणाले.
नवनिर्वाचीत केपे युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत वेळीप यांनी यावेळी बोलताना ज्ये÷ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे कार्य पुढे नेणार असल्याचे सांगितले व युवक काँग्रेसची एक मोठी फळी उभी करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. आज प्रातिनिधीक स्वरुपात सदस्य झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामागे किमान दहा युवक कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. अर्चित नाईक यांनी केले. सुरूवातीला कोविडने मृत्यु आलेल्यांप्रती शांतता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.