ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे शनिवारी सकाळी मुंबईत निधन झाले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सरदार तारासिंह यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षांचे होते.
खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगरपालिकेतून झाली होती. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे. सरदार तारा सिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग अनेक वर्ष प्रतिनिधित्त्व केले होते. मुलूंड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणापासून दूर होते.