ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन स्थितीत समाजाची निरंतर सेवा करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करण्याच्या उद्देशाने शहर भाजपच्या वतीने ‘सेल्फीविथ फ्रंटलाइन कोरोना फायटर अभियाना’चा शुभारंभ शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला.
आज डॉक्टरदिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्या 50 हून अधिक डॉक्टरांचा भाजप कार्यालयात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. भाजपचे स्थानिक स्तरावरील पदाधिकारी आपआपल्या प्रभागातील दोन हजारहून अधिक डॉक्टरांचा आणि अन्य क्षेत्रांतील योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मुळीक म्हणाले, ‘स्वत:ची किंवा कुटुंबाची पर्वा न करता प्रसंगी जीवावर उदार होऊन डॉक्टर आपले समाजसेवेचे कार्य सेवाभावी वृत्तीने करीत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही समाजाची जबाबदारी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरील ताण हलका करण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे.’