‘व्हायबंट मडगाव’ समितीच्या बॅनरखाली रिंगणात, सर्वांगीण विकास , भ्रष्टाचारमुक्त मंडळ देण्याचा प्रयत्न राहणार : आजगावकर
प्रतिनिधी / मडगाव
मडगावचा सर्वांगीण विकास करण्याबरोबर भ्रष्टाचारमुक्त पालिका मंडळ देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून त्यामुळे आमच्या ‘व्हायब्रंट मडगाव’ बॅनरखालील उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले. भाजपने ‘व्हायब्रंट मडगाव’ या समितीच्या बॅनरखाली मडगाव, फातोर्डा व कुडतरी या तीन मतदारसंघांत येणाऱया मडगाव पालिकेच्या सर्व 25 प्रभागांसाठी उमेदवार जाहीर केले असून समितीचे निमंत्रक राजेंद्र तालक यांनी सर्व उमेदवारांची नावे यावेळी घोषित केली.
‘व्हायब्रंट मडगाव’ समितीवर माजी नगराध्यक्षा कमलिनी पैंगीणकर, सुदिन नाईक, फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक तसेच अन्य मान्यवरांचा समावेश असून पालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करून आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम सदर समिती करणार असल्याची माहिती माजी आमदार नाईक यांनी दिली. मडगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘व्हायब्रंट मडगाव’चे उमेदवार झटणार आहेत. मागील 2005 ते 20?15 पर्यंत भाजप पुरस्कृत पॅनलला सत्ता मिळालेली नसली, तरी यंदा जनता भाजपाला पूर्ण साथ देईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. निमंत्रक तालक यांनी सर्व 25 उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले.
बहुतांश नवीन चेहरे
भाजपाने जाहीर केलेल्या आपल्या 25 उमेदवारांमध्ये बहुतांश नवीन चेहरे असून त्यात 7 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यात आर्थुर डिसिल्वा, केतन कुडतरकर, रूपेश महात्मे, सुगंधा बांदेकर या मावळत्या मंडळातील चार नगरसेवकांसह राजेंद्र आजगावकर, सदानंद नाईक व बबिता नाईक या माजी नगरसेवकांचा समावेश आहे, तर 18 नवीन चेहरे आहेत.
नवीन चेहऱयांपैकी सचिन सातार्डेकर, पराग रायकर यांनी मागील पालिका निवडणुकीत नशीब आजमावून पाहिले असता त्यांना यश मिळाले नव्हते, तर मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या विरोधात तीन वेळा मडगाव विधानसभा निवडणुकीत दोन हात केले असता पराभव पदरी पडलेले शर्मद पै रायतूरकर पहिल्यांदाच प्रभाग 12 मधून पालिका निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
7 ख्रिस्ती उमेदवार
भाजप उमेदवारांवर नजर टाकल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी अल्पसंख्याकांकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला असून तब्बल 7 ख्रिस्ती समाजातील उमेदवार दिले आहेत. त्यातील सहा जण फातोर्डातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, तर एक मडगाव मतदारसंघातील प्रभाग 20 मधून लढणार आहे.
तळागाळात काम करून आलेले उमेदवार
आपणही मडगाव पालिकेचे नगरसेवक म्हणून राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. आमच्या काळी आजच्या तुलनेत निधी उपलब्ध होत नसला, तरी आम्ही विकासकामे करून दाखविली. त्याचे कारण म्हणजे आम्ही तळागाळात जाऊन कामे केली. त्याचप्रमाणे ‘व्हायब्रंट मडगाव’मार्फत आम्ही असेच तळागाळात काम करून आलेले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे मडगाव व फातोर्डावासियांची कामे होणार आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हात बळकट करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी यावेळी केले.
‘व्हायब्रंट मडगाव’चे घोषित उमेदवार
प्रभाग | उमेदवार | मतदारसंघ | गट |
1 | रेंझिल मास्कारेन्हस | फातोर्डा | खुला |
2 | कालिदास सी. नाईक (काली) | फातोर्डा | इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित |
3 | झिको ऑल्विन फर्नांडिस | फातोर्डा | खुला |
4 | फ्रान्सिस्को बार्बोझा (श्री) | फातोर्डा | अनुसूचित जमातींसाठी आरक्षित |
5 | आर्थुर डिसिल्वा | फातोर्डा | खुला |
6 | सदानंद नाईक (पाकलो) | फातोर्डा | इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित |
7 | मिलाग्रिना गोम्स डायस | फातोर्डा | अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित |
8 | गजानन अमेय करमली | फातोर्डा | खुला |
9 | नर्मदा व्ही. कुंडईकर | फातोर्डा | खुला |
10 | तेरेझिना (तेरेझा) नोरोन्हा | फातोर्डा | खुला |
11 | जया जे. आमोणकर | फातोर्डा | महिलांसाठी आरक्षित |
12 | शर्मद रायतूरकर | मडगाव | खुला |
13 | केतन कुडतरकर | मडगाव | खुला |
14 | राजेंद्र आजगावकर | मडगाव | खुला |
15 | उदय देसाई | मडगाव | खुला |
16 | अनीषा मोहन नाईक | मडगाव | इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित |
17 | रूपेश महात्मे | मडगाव | खुला |
18 | पराग रायकर | मडगाव | इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित |
19 | मंगला हरमलकर | मडगाव | इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित |
20 | ऍलिंडा रॉड्रिग्स | मडगाव | महिलांसाठी आरक्षित |
21 | सचिन सातार्डेकर | मडगाव | इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित |
22 | प्रभव नायक | मडगाव | खुला |
23 | सुगंधा बांदेकर | कुडतरी | महिलांसाठी आरक्षित |
24 | पार्वती (सुनीता) पराडकर | कुडतरी | महिलांसाठी आरक्षित |
25 | बबिता नाईक | कुडतरी | महिलांसाठी आरक्षित |