राम माधव यांना मिळाले नाही स्थान : तेजस्वी सूर्या यांना महत्त्वाची जबाबदारी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पद स्वीकारल्याच्या 8 महिन्यांनी स्वतःच्या नव्या ‘टीम’ची घोषणा केली आहे. राम माधव, पी. मुरलीधर राव, अनिल जैन आणि सरोज पांडे यांना महासचिव पदावरून हटवत त्यांच्या जागी नव्या चेहऱयांची वर्णी लावण्यात आली आहे.
तेजस्वी सूर्या
कर्नाटकातील भाजपचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाची धुरा देण्यात आली आहे. सूर्या हे पूनम महाजन यांची जागा घेणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी हे बदल महत्त्वाचे मानले जात आहेत. काँग्रेस पक्षातही अलिकडेच मोठे फेरबदल करण्यात आले होते.
नड्डा यांच्या नव्या टीममध्ये भूपेंद्र यादव, अरुण सिंग, कैलास विजयवर्गीय, दुष्यंत कुमार गौतम, डी. पुरंदेश्वरी, सी. रवि, तरुण चुग, दिलीप सैकिया यांना महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बी.एल. संतोष पूर्वीप्रमाणेच संघटन महासचिवाची जबाबदारी सांभाळतील. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत उत्तरप्रदेशातील नेते राजेश अग्रवाल यांना खजिनदारपद देण्यात आले आहे.
मुकुल रॉय यांना मोठे पद
12 नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. यात माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग, वसुंधरा राजे, रघुवर दास यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणारी निवडणूक पाहता मुकूल रॉय यांनाही उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. बिहारमधील नेते राधामोहन सिंग यांनाही हेच पद देण्यात आले आहे.
प्रवक्त्यांची संख्या वाढली
भाजपने आता स्वतःच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची संख्या वाढवून 23 केली आहे. खासदार अनिल बलूनी यांना बढती देत मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. बलूनी हे पूर्वीप्रमाणेच प्रसारमाध्यम प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. नव्या प्रवक्त्यांमध्ये राजीव चंद्रशेखर, संजू वर्मा, इक्बाल सिंग लालपुरा, राज्यवर्धन सिंग राठौड, अपराजिता सारंगी, हिना गावित, गुरुप्रकाश एम. किकोन, नुपूर शर्मा, राजू बिष्ट आणि के. के. शर्मा सामील आहेत.
अमित मालवीय कायम
अमित मालवीय पूर्वीप्रमाणेच नॅशनल आयटी आणि सोशल मीडिया विभागाचे प्रमुख असणार आहेत. डॉक्टर के. लक्ष्मण यांना ओबीसी मोर्चाचे प्रमुखपद देण्यात आले आहे. राजकुमार चाहर यांना किसान मोर्चा, लाल सिंग आर्य यांना अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्षपद मिळाले आहे. समीर ओरांव यांना अनुसूचित जमात मोर्चाचे आणि जमाल सिद्दिकी यांना अल्पसंख्याक मोर्चाचे प्रमुखपद देण्यात आले आहे.
5 नव्या चेहऱयांना संधी
8 राष्ट्रीय महासचिवांमध्ये 5 नवे चेहरे आहेत. भूपेंद्र यादव, अरुण सिंग आणि कैलास विजयवर्गीय हे नव्या कार्यकारिणीतही स्थान मिळवून आहेत. राष्ट्रीय महासचिव म्हणून वर्णी लागलेल्या 5 नव्या चेहऱयांमध्ये दुष्यंत कुमार गौतम, डी. पुरंदेश्वरी, सी.टी. रवि, तरुण चुग आणि दिलीप सैंकिया यांचा समावेश आहे.