तृणमूल काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांचे प्रतिपादन
प्रज्ञा मणेरीकर /पणजी
आगामी निवडणूकांमध्ये भाजपला सरकार स्थापित करायला न देणे हा सर्व विरोधकांचा आणि तृणमूल काँग्रेसचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय समान ध्येय किंवा समविचारी पक्षाशी युती करण्यास तृणमूल काँग्रेस पक्ष तयार आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी तृणमूलला जर आणखी एक मैल पुढे जावे लागले तर तेही आम्ही करू असा विश्वास तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार सुष्मिता देव यांनी निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर तरूण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
निवडणूकांची रणधुमाळी राज्यात सध्या सुरू आहे. सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकही निवडणूकांमध्ये आपले वर्चस्व गाजविण्यासाठी कंबर कसत आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसही गोमंतकीयांसाठी विविध योजनांचा भडीमार करून गोमंतकीयांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. तृणमूल काँग्रेसची नेतेमंडळी सध्या गोव्यात असून त्यातील एक राज्यसभा खासदार सुष्मिता देव ज्या गोवा सहप्रभारीसुद्धा असून निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी गोव्यात दाखल झाल्या आहेत.
गोव्यात बदलासाठी तृणमूल हा मजबूत पर्याय
भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी न देण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी विभाजित झालेल्या सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लोक आता पक्ष राष्ट्रीय आहे म्हणून किंवा दिल्लीतील ग्लॅमरस नेते आहेत म्हणून जात नाहीत. काळ बदलत आहे. परिस्थिती बदलली आहे. तृणमूल काँग्रेसने तळागाळातील गोमंतकीयांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गोव्यात बदल घडण्याकरिता तृणमूल काँग्रेस हा एक नवीन व मजबूत पर्याय म्हणून लोकांना दिसत आहे असे सुष्मिता यांनी सांगितले.
तृणमूल काँग्रेसच भाजपला दूर ठेवू शकतो
भाजपसारख्या लोकविरोधी पक्षाला पराभूत करण्यासाठी योग्य वेळी तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्यात प्रवेश घेतला. आम्ही गोव्यात आलो कारण गोमंतकीयांना विश्वासार्ह पर्यायाची गरज आहे. गोव्याला बदल हवा होता, नवी पहाट हवी होती म्हणून आम्ही आलो. विकास आणि सामाजिक जडणघडणीत भाजपने गोव्याचा नाश केला आहे. यावेळी भाजपच्या कुशासनाचा शेवट करून गोमंतकीयांना योग्य विकास आणि उत्तम जीवनाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्याला गोमंतकीय खरोखर पात्र आहेत. तृणमूल हा एकमेव पक्ष आहे जो भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकतो. तृणमूल काँग्रेस हा विश्वासार्ह पर्याय आहे जो मोदी शहा यांची राजवट संपविण्याची हिंमत ठेवतो, असा दावा सुष्मिता देव यांनी यावेळी केला.
गोव्यात तृणमूल विरुद्ध भाजप लढत
गोव्यातील ही निवडणूक लढत म्हणजे तृणमूल विरूद्ध भाजप. आम्ही भाजपला हुसकावून लावण्यासाठी आलो आहोत. प्रत्येकवेळी भाजपला हरण्याची भीती वाटत असताना ते मतदारांचे विभागीकरण करण्याचा प्रयत्न करतात. सध्या मतदार हुशार झाले असून खोटय़ा बातम्यांना किती महत्त्व द्यायचे हे त्यांना माहीत आहे. बंगालमध्ये भाजपने खोटे व्हिडिओ पसरवून एक उत्तम खेळी खेळली. परंतु परिणाम सर्वांच्या समोर आहे. बंगालमध्ये लोकांनी त्यांना नाकारले. हिंसाचाराचे खोटे व्हिडिओ हे भाजपच्या खोटय़ा कारखान्यातून आले होते. खरे म्हणजे ते व्हिडिओ बांग्लादेशमधील होते आणि भाजपने बंगालमधील हिंसाचार असल्याचा दावा केला होता असा आरोप सुष्मिता यांनी भाजपवर यावेळी केला.
तृणमूल काँग्रेस म्हणजे मंदिर, मशीद आणि चर्च. तृणमूल पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून जो जातीय सलोख्यावर विश्वास ठेवतो. याशिवाय सर्व धर्मांचा आदर करते आणि प्रत्येकजण शांततेने एकत्र रहावे यासाठी कार्य करते. तृणमूल काँग्रेस पक्षाचा कोणताही पक्ष फोडण्याचा हेतू नाही. आम्ही लोकांना या लढय़ात आमच्यासोबत सहभागी होऊन तडजोड न करता लढण्याचे आश्वासन दिले जे इतर पक्षांनी पूर्ण केले नाही. भाजपला हुसकावून लावणे आणि गोवा वाचविणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. मगो हा गोव्यातील सर्वात जुना पक्ष आहे. जनतेची सेवा करणे आणि भाजपपासून मुक्तता करणे हे आमचे एकच ध्येय आहे हे लक्षात घेऊनच आम्ही मगो पक्षाशी युती केली. या युतीमुळे सर्वाधिक फायदा गोमंतकीयांना होईल आणि त्यांना डोळय़ासमोर ठेवूनच निर्णय घेतले जातील असे आश्वासन खासदार सुष्मिता देव यांनी यावेळी दिले.