पी. चिदंबरम यांच्या सुनेचा नृत्याविष्कार दाखविल्याने गोंधळ
तामिळनाडूत निवडणुकीच्या तोंडावरच प्रचारात वापरण्यात येत असलेल्या एका व्हिडीओमुळे भाजपची कोंडी झाली आहे. पुढील आठवडय़ात होणाऱया मतदानापूर्वीच एक वेगळाच प्रकार उघड झाल्याने भाजपचे सोशल मीडिया युनिट तोंडघशी सापडले आहे. भाजपच्या तामिळनाडू युनिटने ट्विटरवर निवडणूक प्रचाराशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली महिला कलाकार काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिदंबरम असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भाजपने आपल्या ट्विटर अकाउंटवरून सदर व्हिडीओ डिलीट केला आहे.
सध्या पाचही राज्यात निवडणूक प्रचार जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तामिळनाडूत यंदा भाजप पक्षाने अण्णाद्रमुकबरोबर युती केली आहे. दोन्ही पक्षांकडून सोशल मीडियाद्वारेही जोरात प्रचार सुरू आहे. मात्र, तामिळनाडूमधील एका व्हिडीओमुळे त्यांची चांगलीच फजिती उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या व्हिडीओत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या सुनेचा नृत्याविष्कार दाखविल्यामुळे सोशल मीडिया टीम अडचणीत सापडली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिदंबरम एक कलाकार असून ते वैद्यकीय व्यावसायिक देखील आहेत. याबाबत काँग्रेसने ट्विट करत भाजपने त्यांच्या परवानगीशिवाय श्रीनिधींचा फोटो वापरल्याचा दावा केला आहे. तसेच भाजपकडे स्वतःचे कोणतेही ध्येय नसल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनीही ट्विटरवर ही माहिती शेअर केली. भाजपच्या प्रचार मोहिमेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर नेटकऱयांनीही त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 234 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.