उत्तराखंडमधील डीडीहाट विधानसभा मतदारसंघ
उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्य़ातील डीडीहाट विधानसभा मतदारसंघात कनालीछीना, डीडीहाट आणि मुनाकोट या भागांचा समावेश होतो. डीडीहाट मतदारसंघातील निम्मा हिस्सा हा नेपाळच्या सीमेला लागून आहे. डीडीहाट क्षेत्रातच पाल राजवंशाची राजधानी अस्कोट हे ठिकाण देखील येत. याचबरोबर या मतदारसंघात सीरादेवल आणि वैकुंठधाम यासारखी प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश आहे. विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी याचे मूळ गाव देखील या मतदारसंघात आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री बिशन सिंह चुफाल हे सलग 5 वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2002 पासून आतापर्यंत डीडीहाट हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात दोनवेळा काँग्रेस तर दोनवेळा उत्तराखंड क्रांती दल दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. तर एकवेळा अपक्ष उमेदवारही दुसऱ्या स्थानी राहिला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत या मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा असल्याने डीडीहाट आता हॉट सीट ठरणार आहे.
उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर 2002 साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते बिशन सिंह चुफाल यांनी उत्तराखंड क्रांती दलाचे घनश्याम जोशी यांना पराभूत केले होते. त्यानंतर 2007 सालच्या निवडणुकीत चुफाल यांनी काँग्रेसचे उमेदवार हेम पंत यांना पराभूत करत मतदारसंघातील स्वतःचा दबदबा सिद्ध केला होता. 2012 च्या निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते चुफाल यांनी काँग्रेस उमेदवार रेवती जोशी यांना पराभूत केले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत चुफाल यांना त्रिकोणी लढतीचा लाभ मिळाला होता.
सामजिक समीकरण
या मतदारसंघात सध्या 82741 मतदार आहेत. डीडीहाट मतदारसंघात सर्व जातींच्या लोकांचे वास्तव्य आहे. जातीय आणि सामाजिक समीकरणे पाहिल्यास या मतदारसंघात क्षत्रिय मतदारांचे प्रमाण अधिक आहे. अन्य मागास वर्ग आणि अनुसूचित जातीचे मतदारही या मतदारसंघाचा निकाल निश्चित करण्यास निर्णायक भूमिका बजावतात.