प्रतिनिधी / सातारा
सातारा नगरपालिकेत मुदत संपल्यावर भाजपचे स्वीकृत नगरसेवक विकास गोसावी यांनी दिलेल्या राजीनाम्याची रिक्त जागा भरण्यासाठी दि.21रोजी दुपारी 3 वाजता ऑन लाईन निवडी होणार आहेत.या निवडीकरता सभा सचिवांनी व्हाट्सएपचा ग्रुप बनवला आहे.त्यावर सभा सचिव सूचना देत आहेत.दरम्यान, सातारा विकास आघाडीचा अजून ट्विस्ट कायम आहे.
सातारा विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत अहिरराव हे कधीही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.मात्र, सातारा विकास आघाडीत ज्यांच्या शब्दाशिवाय पान हलत नाही ते स्वीकृत नगरसेवक दत्ता बनकर हे गेले चार वर्षे स्वीकृत नगरसेवक राहिले आहेत.त्यांच्याकडून आघाडीचे नेते खासदार उदयनराजे यांच्यापर्यंत पालिकेतल्या इंत्यभूत घडामोडी पोहचत असतात.त्यामुळे त्यांचा तर पत्ता कट होणार नाही.परंतु उदयनराजे हे ऐनवेळी कोणताही निर्णय घेऊ शकतात.त्यामुळे दि.21पर्यंत अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे.भाजपकडून स्वीकृत नगरसेवक असलेल्या विकास गोसावी यांना वरिष्ठाचा आदेश येताच त्यांनी आपला राजीनामा दिला.राजीनामा दिल्याने रिक्त जागा भरण्यासाठी शासनाच्या पत्रानुसार रिक्त जागा पालिकेने प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनानुसार ऑन लाईन निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.नगराध्यक्षा माधवी कदम यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यावर सही केली आहे.ते पत्र अजून ही नगरसेवकांना पोहचले नाही.मात्र, सभासचिव श्रीमती भोसले यांनी तयार केलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर तशा सूचना गेल्या आहेत.भाजपकडून विठ्ठल बलशेठवार, सुणेशा शहा, जयदीप ठुसे, सुनील कोळेकर यांच्या नावाची चर्चा आहे.