अनेक ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी : काँग्रेसवर केली कडाडून टीका
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरासह ग्रामीण भागात प्रचार केल्यानंतर आता अरभावी मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन गुरुवारी प्रचार केला आहे. त्या ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गुरुवारी मुडलगी, अरभावी, तुक्मयानट्टी, नागनूर, हळ्ळूर, यादवाड, कुलगोंड, कौजलगी या गावांमध्ये जाऊन प्रचार केला. त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचे काम जे अर्धवट आहे ते पूर्ण करण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी जे योगदान दिले आहे त्याची दखल घेऊन भाजपच्या पाठिशी जनतेने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. भाजपला मत म्हणजे विकासाला मत आणि सर्वसामान्य पक्षाला मत, असे म्हणून जोरदार प्रचार करण्यात आला. प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन हा प्रचार करण्यात आला. प्रचार करत असताना काही ठिकाणी कॉर्नर सभाही पार पडल्या. त्यावेळी काँग्रेसवर कडाडून टीका करण्यात आली. मंगला अंगडी यांच्या प्रचारफेरीमध्ये मंत्री जगदीश शेट्टर यांच्यासह स्थानिक आमदार आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.