पणजी/प्रतिनिधी
भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना पक्षाने पणजीची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले उत्पल यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. यांनतर भाजपकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र उत्पल पर्रिकर यांचे मन वळवण्याचे भाजपचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. उत्पल यांनी आज पणजी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या मतदारसंघात ते अपक्ष निवडणूक लढणार आहेत. दरम्यान, वडिलांनी केलेले कार्य पुढे न्यायचे आहे, असा निर्धार उत्पल यांनी केला असून पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे.
उत्पल यांनी भाजपने पणजीत ‘दलबदलू’ व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. या व्यक्तीने नेहमीच भाजपच्या विरोधात काम केले आहे. पर्रिकर आणि भाजपला साथ देणारा मतदार या व्यक्तीला मतदान करणार नाही. भाजपचे कार्यकर्तेही त्याच्यासोबत काम करणार नाहीत. या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. इतरही गंभीर गुन्ह्यांत ही व्यक्ती आहे. याचा विचार पक्षाने केला नाही याचेच दु:ख वाटते, असे उत्पल म्हणाले.