आमदार कार्लुस आल्मेदा यांचा इशारा
प्रतिनिधी /वास्को
वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी आपले प्रतिस्पर्धी कृष्णा उर्फ दाजी साळकर यांचे भाजपात स्वागतच असल्याचे स्पष्ट करून जमीन विक्री घोटाळय़ात सहभागी असलेल्यांनाही भाजपात प्रवेश मिळतो हे आता जनतेलाही कळले हे चांगले झाले असा उपरोधक टोला मारून भाजपाविरूध्द नाराजीच व्यक्त केली. भाजपाने आतापर्यंत वास्कोला सापत्नभावाची वागणुक दिली. आता साळकर यांच्या पक्ष प्रवेशानंतर तरी वास्कोत काही चांगले घडेल, विकास होईल अशी अपेक्षा करतो असे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले. पक्षाने खंजीर खुपसल्यास पत्ते खोलीन असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.
आमदार कार्लुस आल्मेदा यांना भाजपा यंदा निवडणुकीत उमेदवारी देणार नाही. यंदा वास्कोची उमेदवारी मागच्या निवडणुकीतील भाजपाचे विरोधक व प्रमुख प्रतिस्पर्धी दाजी साळकर यांना मिळेल अशी वंदता पसरली होती. तशा प्रकारच्या हालचाली मागच्या काही महिन्यांपासून भाजपांतर्गंत सुरू होत्या. यंदा साळकर यांना उमेदवारी मिळेल या शक्यतेला साळकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे बळकटीच मिळालेली आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे वास्कोतील राजकारणाला आता वेगळे वळण मिळणार आहे. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी अप्रत्यक्षरीत्या तसेच संकेत दिलेले आहेत.
वास्कोला विकासकामांच्याबाबतीत आता सापत्नभावाची वागणुक मिळणार नाही अशी अपेक्षा
साळकर यांच्या पक्ष प्रवेशाविषयी माध्यमासमोर प्रतिक्रीय व्यक्त करताना आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पक्षावर तोंडसुख घेतले. स्व. मनोहर पर्रीकरांची भाजपा आता राहिलेली नाही. ते चांगले नेते होते. पक्षात आता शिस्त राहिलेली नाही. वास्कोतील काही लोक भाजपात प्रवेश करणार असल्याची कल्पना पक्षाने दिली होती. मात्र, ज्या व्यक्तीविरूध्द आपणच कोमुनिदाद जमीन घोटाळय़ाची तक्रार महसुल विभागाकडे केलेली आहे, त्याच व्यक्तीच्या पक्ष प्रवेशाच्या समारंभात आपण कसा सहभागी होऊ शकतो असे स्पष्ट करून पक्षात त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने चांगले झालेले आहे. जमीन घोटाळय़ात सहभागी झालेलेही भाजपात प्रवेश करू शकतात हे आता जनतेलाही कळलेले आहे असे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले. वास्कोला विकासाच्या बाबतीत भाजपा सरकारकडून सापत्नभावाची वागणुक का दिली जात होती. वास्कोला वाळीत का टाकण्यात येत होते याचेही कारण आता स्पष्ट झालेले आहे. साळकर यांच्या पक्ष प्रवेशाने तरी वास्कोत विकास कामे होतील, काही चांगले घडेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो असे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले.
पक्ष जोपर्यंत पाठीत खंजीर खुपसत नाही तोपर्यंत मी भाजपातच
वास्को हा काँग्रेसचा मतदारसंघ होता. राजेंद्र आर्लेकर यांना निवडून आणून ही जागा काँग्रेसकडून हिसकावून आम्हीच घेतली होती. जी गोष्ट सहजासहजी शक्य नव्हती. जनता भाजपाच्या बाजुने असल्याचे तेव्हापासूनच दिसून आले होते. 2012 साली पुन्हा भाजपाने ही जागा जिंकली. मागच्या निवडणुकीत तर भाजपाने दुसऱयांदा वास्कोत विजय प्राप्त करून इतिहास घडवला. आपण व आपल्या टीमने परिश्रम करून वारंवार यश प्राप्त केले. आपण आजही भाजपाचाच आमदार आहे. भाजपा जोपर्यंत आपल्या पाठीत खंजीर खुपसणार नाही तोपर्यंत मी भाजपामध्येच असेन. मुरगावचे नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते आपल्या बाजुने आहेत. काही कार्यकर्त्यांना जबरदस्तीने पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला पणजीत नेण्यात आले. भाजपाचे कार्यकर्ते खरेच कुणाबरोबर आहेत हे लवकरच स्पष्ट होईल. काही पत्ते आपण अद्याप खोललेले नाहीत. वेळ येताच ते खोलले जातील. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णयाबाबत विचारविनिमय केला जाईल असे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले.