तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी : मतदारांकडे केली मतयाचना
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपनेही प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. शुक्रवारी बैलहोंगल तालुक्मयामध्ये जोरदार प्रचार केला. भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी बैलहोंगल तालुक्मयातील विविध गावांना भेटी देवून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी बैलहोंगलचे माजी आमदार विश्वनाथ पाटील यांनी प्रत्येक गावामध्ये मतदारांच्या गाठीभटी घेतल्या. मंगला अंगडी यांनी यावेळी मतदारांना आपणाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन यावेळी काँग्रेसवर कडाडून टीका केली. काँग्रेसने आतापर्यंत जनतेची केवळ दिशाभूल केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत होती. मात्र आता भाजपने विविध योजना राबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे.
बैलहोंगलसह कित्तूर येथेही प्रचार करण्यात आला. यावेळी मंगला अंगडी यांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस भाजपवर खोटे आरोप करत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनता नक्कीच काँग्रेसला धडा शिकवेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. सर्वच परिसरातून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यापुढेही तुमच्या आशीर्वादाने आम्ही विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मंगला अंगडी यांनी याप्रसंगी दिले.