स्थायी सभापती निवडणूक, सदस्यांना हैद्राबादला हलवले
प्रतिनिधी/सांगली
महापौर, उपमहापौर निवडणुकीप्रमाणे स्थायी समिती सभापती निवडीतही करेक्ट कार्यक्रम होईल याची धास्ती भाजपमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच भाजपने सर्व 9 सदस्यांना हैदाबाद येथे हलवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही घडामोडींना वेग आला आहे. स्थायीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी आघाडीने कंबर कसून व्यूहरचना तयार केल्याने निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विद्यमान स्थायी समिती सभापती पाडूरंग कोरे यांची मुदत नुकतीच पूर्ण झाली. त्यामुळे नव्या सभापती निवडींचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी जाहीर केला आहे. येत्या गुरुवार 9 रोजी ऑनलाईन सभेत सभापती निवड होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. स्थायी समितीमधील 16 सदस्यामध्ये भाजप 9, काँग्रेस 4 तर राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांचा समावेश आहे.
सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षात घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः भाजपकडून अत्यंत सावध पाऊले टाकली जात आहेत. महापौर, उपमहापौर निवडणुकीत बहुमत असूनही भाजपला पराभव पत्कारावा लागला होता. असा दगाफटका स्थायी सभापती निवडीत होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. सदस्य फुटू नयेत म्हणून कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तत्काळ सर्व सदस्यांना हैद्राबाद येथे हलविण्यात आले आहे. भाजपमध्ये निरंजन आवटी यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. सविता मदने, गजानन आलदर इच्छुक आहेत.
एकूणच आघाडीच्या करेक्ट कार्यक्रमाची धास्ती भाजपने घेतली आहे. स्थानिक नेत्यांवर विसंबून न राहता स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संपूर्ण घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सदस्यांना हलविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दरम्यान, आघाडीनेही कंबर कसली आहे. महापौर, उपमहापौर निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेनुसार स्थायी सभापती पद काँग्रेसच्या वाटÎाला आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. वरिष्ठांनी राष्ट्रवादीबरोबर समन्वय साधून स्थायीतही भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी व्यूहरचना केली आहे.
दरम्यान, भाजपचे सर्व 9 सदस्य एकत्र आहेत, कोणीही नाराज नाही. स्थायीमध्ये आमचाच सभापती होईल, असा दावा भाजप गटनेते विनायक सिंहासने यांनी केला आहे. तर काँग्रेसची आघाडी अभेद्य आहे. महापौर निवडणुकीत झलक दाखविली आहे. आताही दाखवण्यासाठी चाचपणी सुरु आहे. भाजपमधील नाराज संपर्कात आहेत. नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर खल सुरु आहे. फिरेज पठाण व करण जामदार इच्छुक आहेत. नेत्यांच्या आदेश येताच यापैकी एकाचा अर्ज दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
स्थायीमधील पक्षीय बलाबल व सदस्य
भाजप ः (9) ः सविता मदने, गजानन आलदर, कल्पना कोळेकर, निरंजन आवटी, संजय यमगर, जगन्नाथ ठोकळे, अनिता व्हनखंडे, पाडुरंग कोरे, सुनंदा राऊत.
काँग्रेस ः (4) ः संतोष पाटील, करण जामदार, फिरोज पठाण, पद्मश्री पाटील.
राष्ट्रवादी (3) ः संगिता हारगे, मनगूआबा सरगर, डॉ. नर्गिस सय्यद