ऑनलाईन टीम / विजयवाडा :
सध्या बाजारात दर्जेदार दारूची किंमत 180 ते 200 रुपये आहे. मात्र, आंध्रप्रदेशात भाजपची सत्ता आल्यास हीच दर्जेदार दारू आम्ही 50 रुपयांमध्ये देऊ, असे अजब आश्वासन आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू यांनी केले आहे.
वीरराजू यांनी मंगळवारी विजयवाडा येथे पक्षाच्या जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी निकृष्ट दर्जाची दारू चढय़ा किमतीत विकल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली. राज्यात सर्वच बनावट ब्रँड्स चढय़ा दराने विकले जातात. मात्र, राज्यात लोकप्रिय ब्रॅन्ड उपलब्ध नाही. सध्या 180 मिली दर्जेदार दारूची किंमत 180 ते 200 रुपये आहे.
राज्यात 1 कोटी लोक दारू पितात. प्रत्येक व्यक्ती दारूवर महिन्याला साधारणपणे 12 हजार रुपये खर्च करतो. या सर्वांनी 2024 च्या निवडणुकीत भाजपला मतदान करावे. आम्ही त्यांना दर्जेदार दारू 70 रुपये दराने देऊ, जर महसूल वाढला तर आम्ही ही बाटली 50 रुपये करू असे वीरराजू यांनी म्हटले आहे.