मगो नेते सुदिन ढवळीकर यांचा इशारा : सरकारच्या तिजोरीत खडखडाट,डॉ.सावंत सरकारची शिदोरी रिकामी माविन गुदिन्होचे अज्ञान पडले उघडे
वार्ताहर / मडकई
सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारविरूध्द मगो पक्ष पुन्हा एकदा या गोमंतभूमीत क्रांती करण्यासाठी सज्ज झालेला आहे. मडगावच्या लोहिया मैदानाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले असून, येत्या 18 जून रोजी मगो याच ऐतिहासिक मैदानावरुन भाजप सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहे. सावंत सरकार व भाजपाविरूध्द लढा देण्यासाठी राज्य पातळीवर मोठा लढा उभा केला जाईल असा इशार मगोचे ज्येष्ठ नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.
गोवा सरकारचे अर्थखाते उथळ झाले असून मागील निवडणूकीत माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांच्या कारकिर्दीत संमत झालेलीच विकास कामे या अडीच वर्षात विद्यमान सरकार राबवीत आहे. या विकासकामांची पायाभरणी व उद्घाटन सोहळे चाललेले आहे. यावरून सरकारचे अर्थखाते खळखळाट करीत असल्याचे सिध्द होत आहे.
सर्व आघाडय़ांवर सरकार अपयशी
आपण स्वतः व माजी मुख्यमंत्री स्व मनोहर पर्रिकर यांनी गोव्यातील अनेक कामांचे नियोजन केले होते. त्यात प्रियोळ मतदारसघातील बहुतांश विकासकामांचा यात समावेश असल्याचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. 50 टक्के अंदाज पत्रकात तरतूद केली असतानाही विज मंत्री निलेश काब्राल यांच्या विकास कामांच्या फाईल का परत येत आहेत. याचाच अर्थ सरकार अर्थखात्याच्या मारत असलेल्या बाता पोकळ ठरत असून सर्वच आघांडय़ावर सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप ढवळीकर यांनी केला.
मंत्री माविन गुदिन्हो यांचे पितळ उघडे
गोवा हे छोटं राज्य असल्याचे कारण सांगून मंत्री मावीन गुदीन्हो यांनी दिल्लीत जाऊन जीएसटीच्या पैशांची मागणी केल्याने तामीळनाडूतील एका मंत्र्यांने मंत्री मावीन गुदीन्होचे पितळ उघडे पाडल्याचे आमदार ढवळीकर यांनी या पत्रकार परिषदेतून सांगितले. यावरून सरकारकडे विकास कामांसाठी पैसे नसल्याचे सिध्द होत आहे.
वीजमंत्र्यांच्या सर्व फाईल्स परत कशा येतात?
वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या फाईल परत येत असल्यामूळे त्यांनी सत्यता जनतेसमोर ठेवताना सरकारलाच घराचा अहेर दिलेला आहे. 28 हजार कोटीच्या अंदाज पत्रकाला जर 50 टक्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मान्यता घेतेलेली असेल. तर 14 हजार कोटी खर्च करता येते. मंत्री काब्राल यांची कामे त्यातून करता आली असती. विरोधी आमदार म्हणून आपल्या सर्वच फाईल सरकार परत पाठवीतात. हे आपण समजू शकतो. पण तुमच्याच मंत्र्याच्या फाईल परत का येतात. म्हणजेच सरकारकडे पैसे नाही. असे सांगून आमदार श्री ढवळीकर यांनी पूढे बोलताना अंदाज पत्रकाप्रमाणे 9 हजार कोटी तरी सरकारने खर्च केले असतील तर त्यांनी सिध्द करून दाखवण्याचे आव्हान दिले.
कोरोनाच्या तिसऱया लाटेबाबत सरकार गंभीर नाही
कोरोनाची तिसरी लाट ही केवढी भयानक असेल याचे चित्र काढता येणार नाही. सरकारचे याबाबत गांभीर्य दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनाची बाधा 3 आणि 4 वर्षाच्या मुलांना झाल्यास ंपरिस्थीती हाता बाहेर जाण्याची शक्यता आहे. ही चिमूरडी मुले 10 दिवस होम आयझोलेशन राहतील का. त्यांना डांबून ठेवणे शक्य आहे. घरात कोणी नातेवाइं&क आल्यास त्यांना ही बाधा झालेली मूले आपोआप बिलगतील. त्यामुळे कोरोनाचा फैलाव हा होत राहील. आरोग्य खात्याने यावर काय तोडगा काढलेला आहे ते आधी त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे.
राज्यात भविष्यात मगोचेच सरकार येईल
प्रियोळ व सावर्डे मतदार संघात बेकायदा कामे हाती घेतल्याची तक्रार अनेक कार्यकर्त्यांनी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले. कुठलेही काम करताना संबंधीत जमीन मालकाचा ना हरकत दाखला घेण्याची आवश्यकता असते. पण या दोन्ही मतदार संघात हा कायदा पायदळी तुडवीला आहे. भविष्यात मगो पक्षाचेच सरकार येतील व त्यावेळी या चौकशीला अभियत्यांना सामोरे जावे लागतील. हे त्या अभियंत्याने लक्षात ठेवावे. माजी सरपंच रोहीदास केरकर व पंचसदस्य मंगलदास गावडे यांनी भाजपासाठी भरपूर काम केलेले आहे. भाजपच्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रियोळ मतदारसंघात कशा प्रकारची वागणूक मिळते. हे प्रियोळच्या जनतेने पाहिलेले आहे. पक्षांच्या वरिष्ठ मंडळीने याची दखल घेणे क्रमप्राप्त होते.
18 जून रोजी लोहीया मैदानावर मगो पक्षाची क्रांती
कॉग्रेस पक्षाच्याही पूढे जावून भाजपाने चालवलेली बजबजपूरी थांबवण्या साठीची ही हाक असेल. स्वाभिमानी गोमंतकीय पेटून उठतील. या धरणी पूत्रांना न्याय देण्यासाठी मगो पक्ष गोव्यात क्रान्ती करेल. जनेतच्या पाठींब्यावर ही क्रांती यशस्वी होणार असल्याचा सार्थ विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.