काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांचा गोवा फॉरवर्डला टोला
प्रतिनिधी / पणजी
भाजपशी हात मिळवणी करणाऱया पक्षांबरोबर युती व आघाडी करण्याचे पाप काँग्रेस पक्ष कधीही करणार नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा फॉवर्डचे नाव न घेता हाणला आहे.
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांबरोबर महाआघाडी करण्याचा प्रस्ताव पत्रकार परिषदेत व्यक्त केला असता त्यावर भाष्य करताना चोडणकर यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. जे लोक भाजपबरोबर आघाडी करून राहतात त्यांच्याबरोबर युती कदापिही शक्य नसल्याचे ते म्हणाले.
गोवा फॉरवर्डला मोदी, शहांची भीती
दैनिक तरुण भारतशी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले की, गोवा फॉरवर्ड पक्षाला सत्तेतून फेकून दिल्यानंतर देखील हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सदस्य म्हणून रहातात याचा अर्थ अमित शहा व नरेंद्र मोदी यांची भीती त्यांना वाटते हे स्पष्ट आहे. गोव्याची निवडणूक 2022 मध्ये आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे केंद्रात मोदी व अमित शहा असतील. त्यामुळे काँग्रेसच्या मदतीने निवडून येणारी मंडळी त्यांच्याबरोबर जाणार नाहीत कशावरून? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळेच अशा पक्षांबरोबर युती वा आघाडी करण्याचे पाप काँग्रेस पक्ष कधीही करणार नाही, असे ते म्हणाले.
यानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येणारे पुन्हा कधीही पक्षांतर करण्याचे धाडस करणार नाहीत, आम्ही आता योग्य खबरदारी घेऊनच उमेदवार निश्चित करणार आहोत, असे गिरीश चोडणकर पुढे म्हणाले.