प्रतिनिधी/ वास्को
सांकवाळच्या सरपंचपदी माजी सरपंच रमाकांत बोरकर यांची बिनविरोध निवड झाली. आठ भाजपासमर्थक पंच असलेल्या सांकवाळ पंचायतीमध्ये रमाकांत बोरकर यांची ऐनवेळी बिनविरोध निवड झाल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. या नाटय़मय घडामोडीत उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल झाल्याने त्यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकीनंतर सांकवाळच्या सरपंचपदी गिरीष पिल्ले यांची निवड झाली होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी पिल्ले यांच्याविरूध्द काही सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून त्यांना पायउतार होण्यास भाग पाडले होते. त्यानंतर नवीन सरपंचांची निवड कोरोना संसर्गाच्या कारणामुळे रखडली गेली. या पंचायतीच्या काही पंचांनाही कोरोनाची बाधा झाली होती. तसेच झुआरीनगरातील वस्तीत कंटेमेंट झोन लागू करण्यात आला होता. या साऱया घटनांचा परीणाम सरपंचपदाच्या निवडणुकीवर झाला होता. मात्र, आता वातावरणात फरक निर्माण झाल्याने गट विकास अधिकारी काल शुक्रवारी पंचायत कार्यालयात नवीन सरपंच निवडण्यासाठी बैठक आयोजित केली होती. पंच नारायण नाईक यांची सरपंचपदी निवड होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र, या बैठकीत अनपेक्षीतपणे माजी सरपंच रमाकांत बोरकर वगळता अन्य कोणीही सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे रमाकांत बोरकर यांची सांकवाळच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीला सांकवाळ पंचायतीचे सर्व पंच सदस्य उपस्थित होते.
विशेष म्हणजे सांकवाळच्या पंचायतीत रमाकांत बोरकर, त्यांच्या पत्नी सुनिता बोरकर व सुकोरिना वालीस हे तिघे पंच वगळता इतर आठ पंच भाजपा समर्थक आहेत. पंचायत निवडणुकीनंतर आमदार एलिना साल्ढाना यांच्या मार्गदर्शनाखाली सांकवाळच्या पंचायत मंडळाची स्थापना झाली होती. भाजपा समर्थक बहुसंख्येने असल्याने रमाकांत बोरकर आपल्या पत्नीसह निवडून येऊनसुध्दा सत्ता काबीज करण्याच्या राजकारणापासून दूरच राहिले होते. मात्र, शुक्रवारी घडलेल्या नाटय़मय राजकीय घडामोडीमुळे त्यांनाच संधी प्राप्त झाली. त्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला. दक्षिण गोवा भाजपा अध्यक्ष असलेले पंच तुळशिदास नाईक यांच्यासह भाजपासमर्थक सर्वच पंचांनी सहकार्य करून बोरकर यांना बिनविरोध सरपंचपद बहाल केले आहे. भाजपाशी आतापर्यंत कोणताच संबंध नसलेल्या बोरकर यांना भाजपा समर्थकांनीच सरपंचपदी विराजमान केल्याने काही भाजपा नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
भाजपा नव्हे, मी नरेंद्र मोदींचा भक्त – रमाकांत बोरकर
भाजपा समर्थकांच्या सहाय्याने सरपंचपदी निवड झाल्याविषयी बोलताना सरपंच रमाकांत बोरकर यांनी आपल्याला भाजपात प्रवेश करण्यासाठी संधी देण्यात आली होती. परंतु आपण अद्याप भाजपावासी झालेलो नाही. मात्र, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे. नरेंद्र मोदींची कार्यपध्दती आपल्याला आवडते. त्यांच्यासारखा नेता अद्याप देशात घडलेला नाही. जगातही त्यांना मोठा मान आहे. पंतप्रधान बनल्यापासून त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेऊन जनतेची मने जिंकली आहेत. पंतप्रधान मोदींबद्दल कुणी वाईट बोललेले मला आवडत नाही. मात्र, आपण भाजपा नव्हे. सांकवाळ पंचायतीत आता भाजपा आणि इतर असा भेदभाव राहिलेला नाही. या पंचायत क्षेत्राचा विकास अधिक गतीने व्हावा या एकमेव कारणासाठी सर्वजण एकत्र आलेले आहेत. विकासासाठीच सर्व पंचांनी मला संधी दिलेली आहे. त्यांचा विश्वास मी सार्थ करीन असे सरपंच रमाकांत बोरकर म्हणाले.
रमाकांत बोरकर यांनी 1989 साली वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत राजकारणात प्रवेश करून सरपंचपद भुषवीले होते. ते सात वेळा सांकवाळ पंचायत क्षेत्रातील विविध प्रभागातून निवडून आले आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी सरपंचपद भुषवीले आहे.
अविश्वास ठरावानंतर उपसरपंचांचा राजीनामा
दरम्यान, रमाकांत बोरकर यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सांकवाळ पंचायतीच्या उपसरपंच कविता कमल यांच्याविरूध्द पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. मात्र, या अविश्वास ठरावाची दखल घेऊन उपसरपंचांनी लागलीच आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. आता उपसरपंचपदासाठी निवडणुक होणार आहे.