तळेरे / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने शुक्रवार दि.१९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ ते रात्रौ १० या वेळेत गोपाळकाल्यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक पटांगणामध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडणा-या पथकास रोख रु १,११,१११ रकमेसह आकर्षक कोकण दूध चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या मंडळाचे हे १० वे वर्ष असून यावेळी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येईल. प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी मोठया उत्साहात दहीहंडी होते परंतु मागील तीन वर्षे महापूर, कोरोना या सारख्या महामारीमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून आपल्याकडील ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना या दहीहंडी उत्सवात सहभागी होता यावे, त्यांना यातून आनंद,उत्साह, व आपले कौशल्य दाखविता यावे त्यातूनही अनेक नवीन गोविंदा पथके निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन व बक्षिसे मिळाविता यावीत या उद्देशाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यातील या गोविंदा पथकांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.