ओटवणे/ प्रतिनिधी-
तेरेखोल नदीच्या महापुरामुळे घरे, शेतमांगर उध्वस्त झालेल्या नुकसानीची सावंतवाडी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
तसेच यावेळी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी महिलांना साड्या व गृहपयोगी वस्तूंची मदत दिली. महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना भाजपच्या महिला पदाधिकारी परिणीता वर्तक व सुकन्या टोपले यांनी ओटवणे सरमळे विलावडे आदी ठिकाणी भेट देत नुकसानीची पाहणी केली.
या सर्व गावांमध्ये पुरामुळे झालेली हानी प्रचंड प्रमाणात असून काही घरे तर पूर्णपणे भुईसपाट झाली आहेत. तर अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. सर्वच घरातील जीवनावश्यक वस्तू, कपडे, धान्य व इतर चीजवस्तू वाहून गेल्या आहेत तर अनेक वस्तूंचे अपरिमित नुकसान झाले आहे. तसेच फ्रीज, वॉशिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उपकरणेही पूर्णतः निकामी झाली आहेत. या सर्वांना मदतीची गरज असून केवळ धान्य स्वरूपात मदत न करता भांडी व गृहपयोगी अन्य वस्तूंची मदत करावी असे आवाहनही परिणीता वर्तक व सुकन्या टोपले यांनी केले.