प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यामध्ये अंगणवाडय़ांना वाटप झालेल्या निकृष्ट पोषण आहाराबाबत तालुका भाजपाने तक्रार दिलेली असताना व संबंधित पोषण आहाराचे गोडाऊन याच कारणामुळे सील करण्यात आले आहे. मात्र असे असतानाही तालुक्यातील अंगणवाडय़ांना पुन्हा त्याच निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे तालुका भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱयांना धारेवर धरले आहे.
या मोहिमेला गुहागर युवासेनेनेही भक्कम साथ दिली आणि या आक्रमकतेमुळे प्रकल्प अधिकाऱयांनी तत्काळ हा निकृष्ट पोषण आहार पुरवठा थांबवण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना दिले आहेत.
तालुक्यातील अंगणवाडय़ांना कोरोना कालावधीनंतर वाटप करण्यात आलेला पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे लक्षात आल्यावर व खात्री झाल्यावर तालुका भाजपाने 2 जुलै रोजी हा निकृष्ट पोषण आहार तातडीने थांबवून चांगल्या दर्जाच्या पोषण आहाराचे वाटप करण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याची लेखी मागणी गटविकास अधिकारी तथा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. मात्र याप्रकरणी कागदी घोडे नाचवण्यात वेळ गेला.
10 जुलै रोजी रत्नागिरी जिह्यात वाटप करण्यात येणारा पोषण आहार ज्या चिपळुण तालुक्यातील खडपोली येथील गोडाऊनमध्ये साठवून ठेवला जातो, पॅकिंग केला जातो, वितरित केला जातो त्याच गोडाऊनमधून दुर्गंधी येत असल्याने तेथील स्थानिकांनी आवाज उठवला व यामुळे साठवून ठेवण्यात आलेला पोषण आहार साठा हा निकृष्ट, सडलेला, दुर्गंधीयुक्त, आरोग्यास हानीकारक असल्याचे सिद्ध झाले. उशिराने व नाईलाजाने का होईना शासनाने कारवाईचा सध्यातरी फार्स केलेला आहे. 10 तारखेला हे सर्व घडून प्रसिद्धी माध्यमातून ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर गेलेली असतानाही गुहागर तालुक्यातील अंगणवाडय़ांना जुलै व ऑगस्ट महिन्याच्या पोषण आहाराचे नव्याने वाटप करण्यात आले. मात्र हा पोषण आहार पहिल्या टप्प्यातील पोषण आहारापेक्षा अधिक निकृष्ट असल्याचे खात्रीशीर लक्षात आले. यावेळी कहर म्हणजे या पोषण आहारात धान्यामधे चक्क उंदराच्या लेंढय़ा आढळल्या आहेत. पूर्वीच्या निकृष्ट पोषण आहाराबाबत तक्रार अर्ज दिलेला असताना व संबंधित गोडाऊन सील केलेले असतानाही जर गुहागर तालुक्यात एकात्मिक बाल विकास विभाग लहान बालकांच्या आरोग्याशी का खेळ करत आहे? असा प्रश्न गुहागर तालुका भाजपाने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱयांना या निवेदनात केला आहे.
याविषयी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांच्याशी संपर्क करून याची माहिती दिली असता त्यांनीही याची तत्काळ दखल घेत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱयांना तशा सूचनाही केल्या. मात्र गुहागर तालुका एकात्मिक बाल विकास विभागांतील कर्मचाऱयांनी हे आमच्या अधिकारात नाही, आम्ही काही करू शकत नाही, आमच्याकडे एकाच अंगणवाडीची तक्रार आहे, पुरवठादार जिल्हय़ातून नेमला जातो, पुरवठादार परस्पर अंगणवाडय़ांना पुरवठा करतो, आमच्या हातात काही नाही, आम्ही पोषण आहार तपासत नाही अशी साचेबद्ध शासकीय उत्तरे दिली. मात्र भाजप-युवासेनेच्या आक्रमकतेमुळे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचे वाटप न करण्याचे तत्काळ आदेश दिले. याविषयी तालुका युवा सेनेचे अधिकारी अमरदीप परचुरे यांनीही या चळवळीला भक्कम साथ दिली. लहान मुलांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱया या प्रश्नाबाबत कोणतीही लापरवाही सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी गटविकास अधिकाऱयांना सांगितले.