ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कुटुंबियांसह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी शेलार यांना दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शेलार यांनी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे.
शेलार यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात या दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे. यापूर्वी 2020 मध्ये शेलार यांना अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांना धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान, शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देणार असल्याचे सांगण्यात येते.