अपक्षाच्या स्वरुपात निवडणूक लढणार
उत्तराखंडमधील रुद्रपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार ठरणार आहे. उमेदवारी नाकारल्याने नाराज आमदार राजकुमार ठुकराल यांनी बंडखोरी केली आहे. समर्थकांसोबत बैठकीनंतर ठुकराल यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ठुकराल हे हिंदू अजेंडय़ावर निवडणूक लढणार असून त्यांची ओळख भगवा झेंडा असणार आहे. शुक्रवारी ते स्वतःचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणूक प्रचारासाठी जाफरपूर आणि रुद्रपूर शहरात स्वतःचे प्रचार कार्यालय सुरू करणार आहेत. भाजपने त्यांना तिकीट नाकारून पक्ष जिल्हाध्यक्ष शिव अरोडा यांना उमेदवारी दिली आहे. अरोडा यांना ठुकराल यांच्या बंडखोरीचा फटका बसू शकतो.
आमदार ठुकराल यांच्या अनेक वादग्रस्त ध्वनिफिती व्हायरल झाल्या होत्या आणि हे प्रकरण पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचले होते. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी ध्वनिफिती व्हायरल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण ठुकराल यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. पक्षनेतृत्वासमोर स्वतःची बाजू मांडली असून चौकशीत सर्वकाही स्पष्ट होईल, असेही त्यांनी म्हटले होते. रुद्रपूरमधून सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले ठुकराल हे स्वतःच्या विधानांमुळे चर्चेत असतात. संघटनविरोधी कृत्यांशी संबंधित त्यांच्या अनेक ध्वनिफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात ते पक्षनेतृत्वापासून प्रदेशाध्यक्ष, कॅबिनेट मंत्री आणि आमदारांना उद्देशून वादग्रस्त विधाने करताना ऐकू येते.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दोन ध्वनिफिती व्हायरल झाल्या असून यातील एकामध्ये ते हिंदू संघटनांवर टिप्पणी करताना आढळून येतात. तर दुसऱया ध्वनिफितीत भाजप सरकारमधील मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप करत आहेत.