आझमगडमध्ये अखिलेश यादवांची घोषणा
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी शनिवारी मोठी राजकीय घटना घडली आहे. भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांचे पुत्र मयंक यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. यासंबंधीची घोषणा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझमगडमध्ये केली आहे. यादरम्यान त्यांनी मयंक यांचे व्यासपीठावर स्वागत केले आहे.
सप उमेदवाराच्या समर्थनार्थ गोपालपूर मतदारसंघात शनिवारी अखिलेश यादव यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांचे पुत्र मयंक देखील सामील झाले.
मयंक यांच्या प्रवेशामुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढणार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांचा उत्साह सहाव्या टप्प्यातच थंडावला असून त्यांच्या घरांवरून पक्षाचे झेंडे उतरविण्यात आले आहेत. सहाव्या टप्प्यापर्यंत समाजवादी पक्षाने बहुमतापर्यंतची मुसंडी मारली आहे. आता बाबा (योगी आदित्यनाथ) मुख्यमंत्र्यांची झोप उडाल्याचे अखिलेश म्हणाले.