महापालिका निवडणुकीसाठी डिप्लोमसी : चंद्रकांतदादा पाटील यांचा निर्णय राहणार अंतिम
संजीव खाडे/कोल्हापूर
राज्याच्या राजकारणात एकाकी पडलेल्या भाजपला कोल्हापुरात ताराराणी आघाडीचा आधार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडी एकत्रित लढणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपला लढावे लागणार आहे. या आघाडीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता असली तरी भाजपला मात्र एकावेळी तीन पक्षांच्या आव्हानाचा सामना करत रणनीती आखावी लागणार आहे. या सर्व राजकीय स्थितीत महापालिका निवडणुकीची सूत्रे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सोपविण्याचे भाजप नेतृत्वाने जवळपास निश्चित केले आहे. अंतिम निर्णय मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचाच राहणार आहे, अशा पद्धतीची व्यूहरचना सध्या सुरू आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची कसोटी लागणार आहे. घरच्या मैदानावर त्यांना सत्ता आणण्याचे आव्हान आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालानंतर सध्या ज्या पद्धतीने राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीसह कोल्हापूर महापालिका निवडणुकीतही प्रभाव पाडावा लागणार आहे. चंद्रकांतदादांसाठीही या निवडणुका महत्वाच्या ठरणार आहेत. महापालिकेच्या 2015 च्या निवडणुकीवेळी चंद्रकांतदादा राज्यात दोन क्रमांकाचे प्रभावशाली मंत्री होते. त्यावेळी त्यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करत ताराराणी आघाडीबरोबर युती करून लक्षणीय यश मिळवले. तेंव्हा भाजपच्या 14 आणि ताराराणी आघाडीच्या 19 अशा 33 जागा आल्या. पण काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेला बरोबर घेत सत्ता स्थापन केल्याने महापालिकेवर कमळ फुलविण्याचे चंद्रकांतदादांचे स्वप्न अपुरे राहिले. पाच वर्षांत चमत्कार झाला नाही. पण एकवेळ स्थायी समितीचे सभापतीपद आशिष ढवळेंच्या रुपाने भाजपला मिळाले.
आता पाच वर्षांनंतर भाजप-ताराराणी आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. गत काही निवडणुकांत भाजपची ज्या पद्धतीने राज्यात पिछेहाट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजप-ताराराणी आघाडीचे नेतृत्व कुणी करायचे? या बद्दल चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीची सूत्रे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे देण्याचे जवळपास निश्चित झाले असून महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे साथीला राहणार आहेत. त्याबरोबर व्यूहरचना करण्यात सुहास लटोरे राहणार आहेत. माजी विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी, ताराराणीचे माजी गटनेते सत्यजित कदम यांच्यावरही जबाबदारी देण्यात येणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे गेल्या काही महापालिका निवडणुकीत किंगमेकर म्हणून भूमिका पार पाडत आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा लाभ घेण्याचे नियोजन झाले आहे. अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे राहणार आहेत.
कोरे, आवाडेंना बरोबर घेण्याचे प्रयत्न
भाजप-ताराराणी आघाडीच्या नेतृत्वाने महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना जनसुराज्य शक्तीपक्षाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे आणि माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन्ही नेत्यांचे काही पॉकेटस् शहरात आहेत.
प्रा. जयंत पाटील भाजप-ताराराणीबरोबर?
महापालिकेच्या राजकारणातील अनुभवी, मुरब्बी नगरसेवक म्हणून नाव असलेले प्रा. जयंत पाटील यंदाच्या निवडणुकीत भाजप-ताराराणीबरोबर राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्याला बळकटीही मिळाली आहे. प्रा. पाटील जर बरोबर आले तर भाजप-ताराराणीला राजकीय निर्णय घेताना लाभ होण्याची शक्यता आहे.