बर्थ डे पार्टीनंतर निर्घृण खून – जातीय हिंसाचाराचा कुटुंबीयांचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील मंगलपुरी परिसरात गुरुवारी रात्री एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. रात्रीच्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बर्थ डे पार्टीनंतर झालेल्या या प्रकाराने खळबळ निर्माण झाली आहे. मृत रिंकू शर्मा हा भाजप युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता. हल्ल्यात जखमी झालेल्या रिंकू शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही संशयितांना अटक झाली आहे. नसरुद्दीन, इस्लाम, झाहीद आणि मेहताब अशी अटक झालेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रिंकू शर्मा याचा नसरुद्दीन याच्याशी काही धार्मिक वक्तव्यावरुन वाद झाला होता. या वादातूनच ही हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नसरुद्दीनने आपल्या तिघा साथीदारांच्या मदतीने जबरदस्तीने घरात घुसून रिंकूच्या पाठीवर चाकूने वार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी निधी जमा करण्यावरुन हत्या झाल्याचा दावा केला आहे. मात्र, आतापर्यंत तपासात मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या वादानंतर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध पातळीवर तपास सुरू केला आहे.