प्रतिनिधी /पणजी
एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रदेश भाजप महिला राज्य कार्यकारिणी तातडीने बरखास्त केली आहे. लवकरच नवी कार्यकारिणी स्थापन केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. शितल दत्तप्रसाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महिला राज्य कार्यकारिणीच्या एकंदरित कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ताळगावमध्ये जेनिफर मोन्सेरात यांच्या विरोधात दत्तप्रसाद नाईक यांनी काँग्रेससाठी काम केले होते. त्याचबरोबर शितल नाईक यांनी देखील काँग्रेससाठीच पतीबरोबर काम केले होते अशी तक्रार मोन्सेरात दांपत्यांनी भाजपकडे केली होती आणि त्वरित कारवाई करावी अशी वारंवार मागणी केली होती. मोन्सेरात यांच्या मागणीला अनुसरुन तानावडे यांनी मंगळवारी संपूर्ण राज्य कार्यकारिणीच बरखास्त केली. आता भाजप नव्याने महिला राज्य कार्यकारिणी स्थापन करणार असून त्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे आहे. कदाचित डॉ. दिव्या राणे यांची त्या जागी नियुक्ती होण्याची शक्यता वाढली आहे.