प्रतिनिधी/ पणजी
भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज होत असून प्रत्येक राज्यातील कार्यकारी समिती सदस्य व्हर्च्युअल पद्धतीने या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.
भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यासह अन्य राष्ट्रीय पदाधिकारी दिल्ली मुख्यालयातून बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक राज्यातील समिती पदाधिकारी आपापल्या कार्यालयातून त्या चर्चेत सहभाग घेणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ही बैठक चालणार आहे.
त्यानुसार गोव्यातून प्रथमच दोन नवीन खास निमंत्रित मंत्री माविन गुदिन्हो आणि विश्वजित राणे यांच्यासह नऊ सदस्य या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. बैठकीत सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्षांचे भाषण असेल. त्यानंतर पुढील वर्षी निवडणुकीस सामोरे जाणाऱया गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब या राज्यांमधील तयारी, संघटनात्मक कार्याच्या दृष्टीने माहिती सादर करण्यात येणार आहे.
त्याशिवाय अनेक ठरावही घेण्यात येणार असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपल्या भाषणादरम्यान त्यांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत. बैठकीसाठी भाजपच्या पणजी मुख्यालयात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
दरम्यान, पेट्रोल महागाईचा भडका उडालेला असताना केंद्र तसेच राज्य सरकारनी विद्यमान किंमतीत काही प्रमाणात कमी देऊन नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद देत असल्याचे तानावडे म्हणाले. देशात जवळजवळ रोजच होणाऱया पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे अनेकदा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतानासुद्धा आम्हाला अवघड होत होते. परंतु आता किंमती कमी करून सरकारने लोकांना दिलासा दिला आहे, असे तानावडे म्हणाले.
कोरोना संकटकाळात लसीकरणासह एकुणच परिस्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारला कोटय़वधी रुपये खर्च करावे लागले. तरीही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईवर तोडगा काढण्यासाठी अबकारी कर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे सुमारे 1.80 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले, असे तानावडे यांनी सांगितले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत, असे ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईबद्दल केंद्राचे आभार ः तानावडे
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 5 आणि 10 रुपये कमी केले आहेत. त्यात राज्य सरकारनेही स्वतःचा व्हॅट प्रत्येकी 7 रुपये कमी केला. त्यामुळे गोव्यात पेट्रोल आणि डिझेल प्रती लिटर अनुक्रमे 12 आणि 17 रुपये एवढे स्वस्त झाले आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यास राज्यातही पेट्रोल-डिझेल आणखीही स्वस्तात उपलब्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सदरप्रश्नी पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया विचारली असता, हा सवाल मला विचारण्यापेक्षा गोव्यात राजकीय पर्यटनासाठी येणाऱयांना विचारा, तसेच त्यांच्या राज्यात पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त करणार हेही त्यांना विचारा, असा टीकावजा सल्ला त्यांनी दिला.
राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्यानंतरसुद्धा पत्रकार त्यांची दखल न घेता उलट पेट्रोलपंच चालकांना सहन कराव्या लागलेल्या नुकसानीबद्दल सरकारला प्रतीसवाल करत असल्याचे भाजपच्या पचनी पडले नसल्याचे दिसून आले.