अनंतनागमध्ये हल्ला – उपचारादरम्यान मृत्यू
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्हय़ात सोमवारी झालेल्या हल्ल्यात भाजपच्या एका सरपंचासह त्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली. गुलाम रसुल दार असे संबंधितांचे नाव असून ते भाजपच्या किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्षही होते. हल्लेखोर फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणांकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी गुलाम रसुल दार यांच्यावर हल्ला चढवला. गोळीबारात दार यांच्यासह समवेत असलेली पत्नीही जखमी झाली होती. दोघांनाही तातडीने इस्पितळात हलविण्यात आले. तथापि, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. दार हे कुलगाममधील रेडवानी गावचे रहिवासी असून सध्या ते अनंतनागमध्ये वास्तव्यास होते. त्याठिकाणीच त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.