सावर्डे गट काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी / धारबांदोडा
बेळगावहून अनमोडमार्गे मोले चेक नाक्यावरून गोव्यात भाजी व इतर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने बंद करण्याची मागणी सावर्डे गट काँग्रेस समितीतर्फे करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे लेखी निवेदन बुधवारी धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात आले. मोलेमार्गे गोव्यात येणाऱया वाहनांची कसून तपासणी होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
बेळगावात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मोलेमार्गे गोव्यात येणारी भाजी व इतर वस्तू बेळगाव व खानापूरमधून येतात. परराज्यातील या वाहनांची योग्य प्रकारे तपासणी होताना दिसत नाही. त्यामुळे ही वाहने बंद करावीत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
शिवाय कर्नाटक राज्यातून वेगवेगळय़ा चोरटय़ा मार्गाने कामगार गोव्यात शिरकाव करीत आहेत. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सीमा भागात पहारा कडक ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
गोव्यात येण्यासाठी कर्नाटकातील लोक रेल्वे मार्ग व रानातील विविध आडवाटांचा वापर करतात. रानातील या आडवाटा व रेल्वे मार्गावरही गस्त वाढविण्याची आवश्यकता असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान मंगळवारी मोले पंचायत मंडळाने मोले चेक नाक्यावर भेट देऊन संबंधित यंत्रणांकडे चौकशी करून खबरदारीच्या उपाययोजनासंबंधी आढावा घेतला. यावेळी सरपंच स्नेहलता नाईक, उपसरपंच सुशांत भगत, पंचसदस्य रामकृष्ण गांवकर, समर कदम व इतर पंच सदस्य उपस्थित होते.