जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणार
प्रतिनिधी / मिरज
शहरातील तात्पुरत्या भाजी मंडईसाठी मी मिरजकर फाऊंडेशनने सुचविलेल्या देवल कॉम्लेक्स पाठीमागील शासनाच्या मोकळ्या जागेची तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी पाहणी केली. या जागेत भाजी बाजार भरविण्यास हरकत नाही. मात्र सदर जागा महाराष्ट्र शासनाची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. याबाबत प्रस्ताव पाठवून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू व भाजी बाजार भरविण्यासाठी महापालिकेला सूचना देऊ, अशी ग्वाही तहसीलदार कुंभार यांनी मी मिरजकर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना दिली.
आयुक्त नितीन कापडणीस यांनीही या जागेचा प्रस्ताव मान्य केला आहे. येथे बाजार बसविल्यास शहरातील मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.