प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील जुना मोटार स्टँड परिसरात असलेल्या भाजी मंडईत खरेदीस गेलेल्या एकाच्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेले 7 हजार 800 रुपये अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेल्याचा प्रकार रविवारी सकाळी 11 च्या सुमारास घडला आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
यातील तक्रारदार प्रदीप रामचंद्र निंबाळकर (वय 46 रा. कोंडवे, ता. सातारा) हे रविवारी सकाळी खिशात 8 हजार रुपये घेवून त्यांच्या मित्रासमवेत साताऱयात आले होते. प्रथम भाजी मंडई खरेदी करुन इतर खरेदी करु असे म्हणून ते दोघेही जुना मोटार स्टँड परिसरात भाजी मंडईत गेले. तिथे निंबाळकर यांनी 200 रुपयांची भाजी खरेदी केली. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास मंडईच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या खिशात असलेली रोख रक्कम नसल्याचे त्यांना लक्षात आले.
त्यांनी आजूबाजुला शोध घेतला. मात्र पैसे मिळून आले नाहीत. शेवटी निंबाळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अज्ञात चोरटय़ाने शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेले 7 हजार 800 रुपये चोरुन नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास हवालदार कुमठेकर करत आहेत.