जागा देण्यासाठी मी मिरजकर फौंडेशनचे तहसीलदारांना साकडे
प्रतिनिधी / मिरज
शहरातील भाजी विक्रेत्यांसाठी रेवणी गल्लीतील शासकीय तंत्रनिकेतनच्या मोकळ्या गोडावूनमधील जागेचा पर्याय पुढे आला आहे. मी मिरजकर फौंडेशनने यासाठी पुढाकार घेतला असून, गोडावूनमध्ये भाजी मंडई सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
शहरातील भाजी मंडईचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडला आहे. निधी उपलब्ध असूनही भाजी विक्रेत्यांना हक्काची आणि सोयीची जागा मिळाली नाही. खंदकाच्या जागेत अद्ययावत भाजी मंडई उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र, मंडईच्या जागेतच सध्या पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याने भविष्यात येथे भाजी मंडई उभी राहिल कि नाही? याबाबत साशंकता आहे. आता शासकीय तंत्रनिकेतनच्या गोडावूनचा पर्याय पुढे आला असून, तेथे भाजी मंडई बसविण्यास प्रशासनाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे.