सावंतवाडी:
सावंतवाडी शहर ‘कोरोना’पासून बचावासाठी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह 19 नगरसेवकांनी कंबर कसली आहे. प्रभागवार जंतूनाशक फवारणी, आरोग्य तपासणी केली जात आहे. नगराध्यक्ष परब यांनी भाजी विक्रेते, दुकानदारांची आरोग्य तपासणी हाती घेतली आहे. सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात नगरपरिषदेतर्फे जंतूनाशक फवारणी करून घेत घरातील प्रत्येक व्यक्तीला मास्कचे वितरण केले.
प्रभाग एकच्या भाजपच्या नगरसेविका दीपाली भालेकर यांनी संपूर्ण प्रभागात नगरपरिषदेच्यावतीने जंतूनाशक फवारणी करून घेतली. तसेच प्रत्येक व्यक्तीला मास्कचे वितरण केले. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपच्या नगरसेवकानी आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी मास्क व प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी आरोग्य पथकामार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली. आरोग्य सभापती ऍड. परिमल नाईक यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष दिले आहे. उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, पाणी पुरवठा सभापती नासीर शेख, नगरसेवक आनंद नेवगी, बाबू कुडतकर, राजू बेग, सुधीर आरिवडेकर, सुरेंद्र बांदेकर, अनारोजीन लोबो, माधुरी वाडकर, दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, दीपाली सावंत, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, उदय नाईक, भारती मोरे, मनोज नाईक, डॉ. जयेंद्र परुळेकर हे आपल्या प्रभागात लक्ष ठेवून आहेत.