बोरीचे नवसाई मंडळ प्रथम तर म्हापशाचे स्वरसाई दुसरे
वार्ताहर /पणजी
भाटले युवक संघाने स्व. किशोर के. पार्सेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या पहिल्या अखिल गोवा घुमट आरती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि स्पर्धा रंगतदार झाली. पहिले बक्षीस नवसाई घुमट आरती मंडळ बोरी यांना तर दुसरे स्वरसाई घुमट आरती मंडळ म्हापसा यांना प्राप्त झाले.
भाटले येथील श्री सटी भवानी देवस्थानच्या मंडपात पार पडलेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला दुर्गाकुमार नावती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर माजी नगरसेविका उमा (श्यामल) विलास नाईक, देवस्थानचे व्यवस्थापक रामचंद्र आजगावकर, भाटले युवक संघांचे अध्यक्ष सप्रेम किशोर पार्सेकर, सदस्य सागर किशोर पार्सेकर, प्रतीक नार्वेकर तसेच अन्वय नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.
घुमटवादन ही आपली समृद्ध परंपरा
घुमटवादन ही आपली समृद्ध परंपरा आहे. पूर्वजाकडून हस्तांतरित झालेल्या या कलेच्या सादरीकरणात नावीन्य आणि कल्पकतेचा समावेश करताना सुसंगती आणि शास्त्र याचेही यथोचित भान ठेवायला हवे. आज सुवारी वादनातील चंद्रावळ, फाग, खाणपद हे प्रकार दुर्मिळ झालेले आहेत. मोनिचाल या प्रकारच्या सदरीकरणाबाबत एकवाक्मयता नाही अशावेळी घुमट वादन परंपरा नेमकेपणाने जपणे गरजेचे असल्याचे आग्रही मत प्रमुख पाहुणे दुर्गाकुमार नावती यांनी व्यक्त केले.
दुपारी श्री सटी भवानी देवस्थानचे अध्यक्ष रामदास आरोंदेकर, रामचंद्र आजगावकर, राजू गोलतकर, विवेक मडकईकर, सप्रेम किशोर पार्सेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
स्पर्धेतील पहिले बक्षीस नवसाई घुमट आरती मंडळ बोरी, दुसरे स्वरसाई घुमट आरती मंडळ म्हापसा, तिसरे श्री सातेरी घुमट आरती मंडळ म्हापसा, चौथे श्री महालसा घुमट आरती मंडळ म्हार्दोळ, पाचवे साई दामोदर घुमट आरती मंडळ मडगाव यांना मिळले. उत्कृष्ट घुमटवादनाचे बक्षीस काजरेश्वर घुमट आरती मंडळ लामगाव डिचोली यांना देण्यात आले. उत्कृष्ट समेळवादकाचे बक्षीस सर्वेश नाईक, श्री वैरागी नवदुर्गा घुमट आरती मंडळ मडकई यांना तर उत्कृष्ट कासाळेवादकाचे बक्षीस सार्थक कुबल, श्री हनुमान पुरमारेश्वर घुमट आरती मंडळ पीर्ण बार्देश यांना आणि उत्कृष्ट गायकाचे बक्षीस रामदास बोरकर, श्री महालसा घुमट आरती मंडळ म्हार्दोळ यांना प्राप्त झाले.
सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक व रोख रक्कम बक्षिसाच्या रुपात देण्यात आले. या स्पर्धेत गोव्यातील 14 घुमट आरती मंडळे सहभागी झाली होती. प्रसाद कांबळी व धर्मेंद्र सातार्डेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सूत्रसंचालन तुषार नाईक यांनी केले तर सप्रेम किशोर पार्सेकर यांनी आभारप्रदर्शन केले.