प्रतिमहिना तीन हजार रूपये भाडे असल्याने नागरिकांची पाठ
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ नाका येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळयांचे भाडे तीस हजार रूपये निश्चित करण्यात आले होते. सदर गाळयाचे भाडे जास्त असल्याने लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. दोघांनी सहभाग घेतला होता.पण बोली लावण्यास किमान तीन नागरिक आवश्यक असल्याने लिलाव प्रक्रिया बारगळली. मात्र गोवावेस येथील चार गाळयापैकी दोन गाळयांना भाडेकरू मिळाले आहेत.
महापालिकेचा महसुल वाढविण्यासाठी रिकामी झालेले गाळे आणि भाडेकराराची मुदत संपलेले गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. अनगोळ नाका येथील दोन गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. सदर गाळे मोठे असल्याने पाच लाख रूपये अनामत रक्कम आणि प्रति महिना तीस हजार रूपये भाडे महापालिकेने निश्चित केले होते. गाळे मुख्य रस्त्यावर असल्याने गाळे भाडेतत्वावर घेण्यासाठी अनेक व्यावसायिक इच्छुक होते. पण गाळयाचे भाडे जास्त असल्याने कोणीच सहभाग घेतला नाही. तीस हजार रूपये भाडे आणि जीएसटी मुळे एका गाळयाचे भाडे पस्तीस हजार रूपयाच्या घरात पोहचते. त्यामुळे नागरिकांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविली होती. दोन्ही गाळयाकरिता दोघानी लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता. पण बोली लावण्यासाठी किमान तीन नागरिक असणे आवश्यक असल्याने महापालिकेच्या नियमानुसार लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे दोन्ही गाळे भाडेतत्वावर देण्याचे बारगळले आहे. गोवावेस येथील चार गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी देखील लिलाव आयोजित करण्यात आला होता. पण सदर याकरिता चार नागरिकांनी लिलाव प्रक्रियेत भाग घेवून बोली लावली होती. गाळयांना तीन हजार रूपये भाडे निश्चित करण्यात आले होते. गाळयांना तीन हजार रूपये एकशे पन्नास रूपये बोली लावण्यात आली. यावेळी केवळ दोन गाळयांना बोली लावण्यात आली. यामुळे चारपैकी दोन गाळे भाडेतत्वावर देण्यात आले. लिलाव प्रकियेवेळी महसुल अधिकारी संतोष अनिशेट्टर, मार्केटचे महसुल निरीक्षक नंदु बांदिवडेकर, शिवा जाधव, लेखाधिकारी आनंद होंगल, सुशांत कांबळे, अशोक गुदली यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.