ज्येष्ट समीक्षक आणि लेखक प्रा.श्रीकृष्ण अडसूळ यांचे प्रतिपादन : केपे महाविद्यालयात गो.पु.हेगडेदेसाई जयंती कार्यक्रम उत्साहात.राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सेंट झेव्हियर्स कॉलेज म्हापसाची बाजी
प्रतिनिधी /पणजी
गो.पु.हेगडेदेसाई यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पोर्तुगीज सरकारवर ताशेरे ओढले. आवाज उठवला. तसाच आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा आणि परंपराविरुद्ध आवाज उठवताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतकारांचा हा आधुनिक विचारांचा वारसा विद्यार्थ्यांनी पुढे चालविला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ट समीक्षक, लेखक व पार्वतीबाई चौगुले कॉलेज मडगावचे माजी मराठी विभाग प्रमुख श्रीकृष्ण अडसूळ यांनी केले.
गो.पु. हेगडेदेसाई प्रतिष्ठान, गोवा मराठी अकादमी आणि मराठी विभाग, कला, विज्ञान आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालय केपे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गो.पु.हेगडे देसाई जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, गो.पु.हेगडेदेसाई प्रतिष्टानचे यतीन हेगडेदेसाई, गोवा मराठी अकादमी केपे केंद्राच्या सचिव रेणुका फळदेसाई,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जॉयदीप भट्टाचार्यजी, मराठी विभाग प्रमुख सारिका आडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी केपेतील गो.पु.हेगडेदेसाई यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्याहस्ते पुष्षा?जली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.सारिका आडविलकर म्हणाल्या की, मराठी विभाग सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यातून मराठी विभागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आहे. विशेष अतिथी प्राचार्य अनिल सामंत म्हणाले की केवळ गो.पु.हेगडेदेसाई यांचा इतिहास मांडण्यासाठी हा कार्यक्रम नाही आहे, तर त्यांच्या विचारातून विद्यार्थ्यांचे वर्तमान बदलण्यासाठी हा कार्यक्रम आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जॉयदीप भट्टाचार्य यांनी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या प्रगतीत मराठी विभाग अग्रेसर असून मराठी विभागाने वेगवेगळे उपक्रम राबवावेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. जयप्रभू कांबळे यांनी केले तर आभार यतीन हेगडे देसाई यांनी मांडले.
राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत मानसी शेटमांदेकर प्रथम
गो.पु.हेगडेदेसाई यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळय़ा महाविद्यालयातील 18 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये मानसी शेटमांदेकर (सेंट झेव्हियर्स कॉलेज म्हापसा), आशिया देसाई (गोवा विद्यापीठ), दीप गावकर (मल्लकार्जुन महाविद्यालय काणकोण) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. चैताली जांबावलीकर, व सायली गर्दे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.
मराठी विभागातील विद्यार्थ्यांचा गौरव
2018 ते 2019, 2019 ते 2020 या काळात मराठी भाषेत महाविद्यालयात प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविणाऱया विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 2018 ते 2019 या वर्षासाठी वर्षा घाडी आणि हर्षदा वेळीप, तर 2019 ते 2020 या वर्षासाठी वैभवी शहापूरकर व रितिका गिरी यांना गौरविण्यात आले.