10-2 गोलफरकाने विजय, हरमनप्रीत सिंगचे चार, शिलानंद लाक्राचे दोन गोल
वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रूम, द.आफ्रिका
डॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या चार गोलांच्या बळावर भारताने एफआयएच प्रो हॉकी लीगमधील सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा दुसऱयांदा 10-2 अशा गोलफरकाने धुव्वा उडवित या दौऱयाची विजयी सांगता केली.
पहिल्या सत्रात दोघांची 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतरच्या तीनही सत्रांवर भारतानेच पूर्ण वर्चस्व राखत तब्बल 9 गोलांची बरसात केली आणि या दौऱयातील तिसरा विजय नोंदवला. शनिवारी भारतापेक्षा खालच्या क्रमांकावर असणाऱया फ्रान्सने भारताला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला होता. भारताने याआधी पहिल्या टप्प्यात द.आफ्रिकेविरुद्ध झालेल्या लढतीतही याच फरकाने विजय मिळविला होता. दुसऱया टप्प्यातील सामन्यात हरमनप्रीतने चार (36, 52, 60, 60 वे मिनिट), शिलानंद लाक्राने दोन (27 व 48), सुरेंदर कुमार, (15), मनदीप सिंग (28), सुमित (45), शमशेर सिंग 56) यांनी भारताचे गोल नोंदवले. दक्षिण आफ्रिकेचे गोल डॅनियल बेल (12), कॉनर ब्युचॅम्प (53) यांनी गोल केले. चौथ्या सत्रात भारताने एकूण पाच गोल नोंदवले, त्यातील दोन गोल हरमनप्रीतने केले. भारताची पुढील लढत स्पेनविरुद्ध भुवनेश्वरमध्ये होणार आहे.
भारताने पहिल्या सत्रात यजमानावर बऱयापैकी वर्चस्व राखत प्रतिस्पर्ध्याच्या सर्कलमध्ये अनेकदा धडक मारली. मात्र पहिला गोल नोंदवला ते द.आफ्रिकेने. 12 व्या मिनिटाला डॅनियल बेलने त्यांना मिळालेल्या दुसऱया पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. तीनच मिनिटानंतर भारताने बरोबरी साधली. सुरेंदर कुमारने अप्रतिम मैदानी गोल नोंदवत हे यश मिळविले. दुसऱया सत्रात भारताने दोन झटपट गोल नोंदवले. शिलानंद लाक्रा व मनदीप सिंग यांनी हे मैदानी गोल नोंदवले आणि मध्यंतराला भारताने 3-1 अशी आघाडी मिळविली होती.
पीआर श्रीजेशऐवजी गोलरक्षण करणाऱया कृष्णा बहादुर पाठकने 24 व्या मिनिटाला द.आफ्रिकेला मिळालेल्या तिसऱया पेनल्टी कॉर्नरवर अप्रतिम बचाव करीत गोल वाचवला. तिसऱया सत्राच्या सुरुवातीलाही त्याने असेच अप्रतिम गोलरक्षण करताना जेथ्रो युस्टिसचा पेनल्टी स्ट्रोक अडविला. काही वेळ दक्षिण आफ्रिकेने जोर केल्यानंतर भारताने पुन्हा नियंत्रण मिळवित अनेक धोकादायक चढाया केल्या. 36 व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या तिसऱया पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने गोल नोंदवल्यानंतर सुमितने 45 व्या मिनिटाला रिव्हर्स फ्लिकवर शानदार मैदानी गोल करीत भारताची आघाडी 5-1 अशी केली. शेवटच्या सत्रातही भारताने आणखी पाच गोल नोंदवले. 53 व्या मिनिटाला द.आफ्रिकेने आपला दुसरा गोल नोंदवला. त्याच मिनिटाला शमशेरने भारताचा मैदानी गोल केल्यानंतर हरमनप्रीतने हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि नंतर वैयक्तिक चौथा गोलही नोंदवत एकतर्फी विजय साकार केला.