डब्ल्यूटीओची माहिती: बंदरांवर विशेष सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने व्यापार विषयक सुविधा देण्यासाठी वर्ष 2015 ते 2020 च्या दरम्यान काही विशेष उपाययोजना लागू केल्या आहेत, अशी माहिती जागतिक व्यापारी संघटनेने (डब्लूटीओ) दिली आहे.
सदर नवीन सुविधांमध्ये प्रामुख्याने आयात आणि निर्यात प्रक्रिया तसेच सीमाशुल्क यामध्ये शिथिलता देण्यासाठी प्रयत्न केला आहे. भारताकडून 2015 पासून सुरु करण्यात आलेल्या व्यापारी सुविधांमध्ये भारतीय सीमा शुल्क इलेक्ट्रॉनिक गेटवे (आयएसगेट), व्यापारास चालना देण्यासाठी एक खिडकी, बंदरावर थेट डिलिव्हरी आणि थेट प्रवेशाची सुविधा यासह अन्य जोखीम प्रबंधन प्रणालीचा वापर करण्यात आल्याची दखल जिनिव्हा येथे मुख्यालय असणाऱया जागतिक व्यापारी संघटनेने घेतली आहे.
जागतिक व्यापारी संघटनेमध्ये 6 जानेवारी रोजी भारताची सातवी व्यापारी धोरण समीक्षा (टीपीआर) सुरु झाली आहे. यामध्ये भारताने देशातील व्यापार क्षेत्रात बदलासाठी प्रयत्न केले आहेत. जागतिक पातळीवरील आर्थिक विभाग हा प्रामुख्याने कोरोना संकटाच्या कारणामुळे मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाला आहे. परंतु जागतिक पातळीसह देशातील नवनवीन सुविधांच्या प्रयत्नामुळे व्यापार क्षेत्र काही प्रमाणात सुधारत गेले.