कोलंबो / वृत्तसंस्था
भारताने श्रीलंकेला कोरोना लसीकरणाचे 5 लाख डोस मोफत दिले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे ही लस पोहोचल्यानंतर स्वतः विमानतळावर गेले होते. त्यांनी कोव्हिशिल्ड लसीसाठी भारताचे आभारही मानले. ‘भारताकडून पाठवण्यात आलेले कोरोना लसीचे 5 लाख डोस मिळाले. अत्यंत आव्हानात्मक प्रसंगात भारताने श्रीलंकेच्या लोकांसाठी दाखवलेल्या उदारतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या नागरिकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत’, असे ट्विटही राजपक्षे यांनी केले आहे.
श्रीलंकेला भारताकडून कोरोना प्रतिबंधक लस प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी कोलंबोच्या आसपास असणाऱया 6 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला प्रारंभ झाला. याअंतर्गत सर्वात आधी आरोग्य कर्मचारी, सेनेतील जवान आणि सुरक्षा रक्षकांना ही लस देण्यात आली.
भारताने यापूर्वीच भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, अफगानिस्तान आणि मॉरिशस आदी शेजारी देशांना मदत म्हणून कोरोना लसीकरणाचे डोस मोफत देण्यासंबंधीची घोषणा केली होती. भारताकडून आतापर्यंत नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि मालदीवला हे डोस पोहोचण्यात आले आहेत.