वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई विकास बँकेने (एडीबी) 2022-23 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज सात टक्क्यांवर जैसे थे ठेवला आहे. मात्र, आशियातील विकासाचा वेग पूर्वीपेक्षा काहीसा कमकुवत राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
एडीबीने 2022-23 (एप्रिल 2022 ते मार्च 2023) साठी भारताच्या आर्थिक वाढीचा सात टक्के अंदाज सप्टेंबरच्या अंदाजाइतकाच राहिला आहे. तथापि, 2021-22 मध्ये देशाचा जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) दर 8.7 टक्के होता. तसेच 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज 7.2 टक्क्यांवर ठेवला आहे.
एडीबीने सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, आशियाचा विकास यंदा 4.2 टक्के दराने होईल आणि 2023 मध्ये ही वाढ 4.6 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, या वर्षाच्या सुरुवातीला आशियाचा विकास दर 4.3 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
अहवालात म्हटले आहे की, विपरीत जागतिक परिस्थिती असूनही, मजबूत देशांतर्गत स्थितीमुळे भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. त्यात पुढे म्हटले आहे, ग्राहकांचा आत्मविश्वास, वीज पुरवठा, पीएमआयचे काही अलीकडील आकडे जे फारसे अनुकूल नाहीत. तसेच निर्यात, विशेषतः कापड आणि लोह खनिज यांच्याबाबतीतही फारसे काही उत्साहवर्धक दिसत नाही. त्यामुळेच आधीच्या अंदाजात बदल न करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.