बुद्धिबळ ऑलिम्पियाड टायब्रेकमध्ये अमेरिकेची भारतावर मात, रशियाही अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ चेन्नई
फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. विश्वनाथन आनंदच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उपांत्य फेरीत ब्लिट्झ टायब्रेकमध्ये अमेरिकेकडून 4.5-1.5 अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला.
यातील पहिल्या फेरीत भारताने अमेरिकेवर 5-1 असा विजय मिळविला होता. पण दुसऱया फेरीत अमेरिकेने भारतावर 4-2 अशी मात करीत बरोबरी साधली आणि टायब्रेकरमध्ये भारताला नमवित अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी रशिया व अमेरिका यांच्यात लढत होणार आहे.
उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात भारताने अमेरिकेवर मोठय़ा फरकाने विजय मिळविला. विश्वनाथन आनंद, पी.हरिकृष्ण, द्रोणावली हरिका, आर. वैशाली यांनी आपापले सामने जिंकले. पांढऱया मोहरांनी खेळणाऱया आनंदने अव्वल पटावर जेफरी झियाँगवर मात केली. आनंदने ही लढत 57 चालीत संपवली. हरिकृष्णने डेरियस स्वीर्त्झचे कडवे आव्हान मोडून काढत विजय मिळविला तर हरिकाने कठीण स्थितीतही संयमी खेळ करीत ऍना झॅटोनस्कीहवर मात केली. वैशालीने थालिया सर्वांटेस लँडीरोला 38 चालीत नमविले. कोनेरू हंपी व इरिना क्रश आणि अवंडर लियांग व निहाल सरिन यांच्या लढती अनिर्णीत राहिल्या.
दुसऱया टप्प्यात मात्र अमेरिकने बाजी पलटवत भारतावर मात करून बरोबरी साधली. आनंदला झियाँगकडून 35 चालीत पराभव स्वीकारावा लागला. त्याचा हा या स्पर्धेतील पहिला पराभव होता. त्यानंतर विदित गुजराथीही रे रॉबसनकडून पराभूत झाला तर आर. प्रज्ञानंदला अवंडरने हरविले. हंपी व वैशाली यांनी आपापले सामने अनिर्णीत राखले. या फेरीत डी. हरिकाने भारताचा एकमेव विजय नोंदवताना नाझीचा पराभव केला. बरोबरी झाल्याने ब्लिट्झ टायब्रेक घेण्यात आले आणि त्यात अमेरिकेने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखविले. झियाँगने अमेरिकेला उत्तम सुरुवात करून देताना पी. हरिकृष्णला हरविले. हरिकाने पुन्हा एकदा नाझीला हरवून भारताचा विजय नोंदवला. पण यानंतर भारताची घसरणच झाली. वैशालीला वेळेच्या बंधनात थालियाकडून तर बी.अधिबन व हंपी यांना रॉबसन व इरिनाकडून पराभव स्वीकारावा लागला व निहाल सरिनने अवंडरला बरोबरीत रोखले.
अन्य एका उपांत्य लढतीत रशियाने चीनचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. रशियाने पहिल्या टप्प्यात चीनवर 3.5-2.5 अशी मात केल्यानंतर दुसऱया टप्प्यातही चीनला 4-2 असे नमवित त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.