ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी असलेल्या संघटनेने भारताचा वादग्रस्त खलिस्तानी नकाशा जारी केला आहे. या नकाशात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान तसेच उत्तरप्रदेशातील काही जिल्हे खलिस्तानचा भाग म्हणून दाखविण्यात आले असून, या भागाला ‘सिख राष्ट्र खलिस्तान’ असे नाव दिले आहे.
सिख फॉर जस्टिस ही संघटना पंजाबला भारतातून वेगळं करुन खलिस्तानी बनविण्याची मागणी करत आहे. 2019 मध्ये या संघटनेने पंजाब स्वतंत्रता जनमत संग्रह अभियानाची सुरुवात केली होती. त्यामुळे भारताने या संघटनेवर बंदी घातली होती. आता या संघटनेने पुन्हा डोके वर काढले असून भारताचा वादग्रस्त नकाशा जारी केला आहे. ज्यात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान तसेच उत्तरप्रदेशातील काही जिल्हे खलिस्तानचा भाग दाखविण्यात आले आहेत. तसेच लवकरच या भागावर कब्जा करुन खलिस्तान निर्माण केला जाईल, असे या संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनी खलिस्तानचं समर्थन करणाऱया सिख फॉर जस्टिस संघटनेचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू आणि त्याच्या साथीदारांवर मागील वषी देशद्रोहाचे खटले दाखल केले आहेत.