वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी प्रो लिग स्पर्धेतील येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान भारताने युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या जर्मनीचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात उपकर्णधार हरमनप्रित सिंगने दोन गोल तर अभिषेकने एक गोल केला.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आता भारताने 11 सामन्यातून 24 गुणासह आघाडीचे स्थान आणखी भक्कम केले असून भारतीय हॉकी संघाने 7 विजय नोंदविले आहेत. भारताबरोबर झालेल्या पहिल्या टप्प्यातील या सामन्यात जर्मनी संघातर्फे 12 हॉकीपटूंनी आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या कनिष्ठ पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत जर्मनीने उपविजेतेपद पटकाविले होते. उपविजेतेपद मिळविणाऱया जर्मनीच्या कनिष्ठ संघातील 12 हॉकीपटूंची या हॉकी प्रो लिग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या सामन्यातील 18 व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने पेनल्टी कॉनर्रवर भारताचे खाते उघडले. 27 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि उपकर्णधार हरमनप्रित सिंगने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत भारताने जर्मनीवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. 45 व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर अभिषेकने आपल्या संघाचा तिसरा गोल नोंदवून जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात अभिषेकला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर असलेला जर्मनी संघ भारतापेक्षा सात गुणांनी पिछाडीवर आहे. जर्मनीने 9 सामन्यात 17 गुण मिळविले आहेत. आता भारताचा परतीचा जर्मनीबरोबरचा सामना शनिवारी खेळविला जाणार आहे.