वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली जिमखाना क्लबच्या ग्रासकोर्टवर झालेल्या 2022 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील विश्व गट-1 प्ले ऑफ लढतीत यजमान भारताने डेन्मार्कचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत या स्पर्धेच्या विश्व गट-1 मध्ये स्थान मिळविले आहे.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या दुहेरीच्या सामन्यात रोहन बोपण्णा आणि दिविजू शरण यांनी डेन्मार्कच्या कर्णधार प्रेड्रीक निल्सन आणि त्याचा साथीदार मायकेल टॉर्पेगार्ड यांचा 6-3, 6-4, 7-6 (7-4) असा पराभव केला. या लढतीतील शुक्रवारी पहिल्या दिवशी भारताने सलामीचे दोन्ही एकेरी सामने जिंकले होते. रामकुमार रामनाथन आणि युकी भांब्री यांनी एकेरी सामने जिंकून भारताला पहिल्या दिवशी 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती.
शनिवारी परतीच्या एकेरी सामन्यात रामकुमार रामनाथनने डेन्मार्कच्या जोनेस इंग्लीडेसनचा 5-7, 7-5, 10-7 असा पराभव करत भारताला 4-0 अशी एकतर्फी विजयी आघाडी मिळवून दिली. 1984 नंतर प्रथमच भारत आणि डेन्मार्क यांच्यातील ही डेव्हिस चषक लढत खेळविली गेली. 1984 साली झालेल्या लढतीत भारताने डेन्मार्कवर 3-2 असा विजय माळविला होता. तत्पूर्वी म्हणजे 1927 साली भारत आणि डेन्मार्क यांच्यात कोपेनहॅगेन येथे पहिल्यांदा झालेल्या डेव्हिस चषक लढतीत डेन्मार्कने भारताचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला होता. आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱया सर्वांत जुन्या डेव्हिस चषक स्पर्धेत भारताने 1966, 1974 आणि 1987 साली अंतिम फेरी गाठली होती. मात्र भारताला आजपर्यंत एकदाही डेव्हिस चषक जिंकता आलेला नाही.