हॉकी प्रो लीग : 10-2 गोलफरकाने मात, जुगराज सिंगची हॅट्ट्रिक, गुरसाहिबजित, दिलप्रीतचे प्रत्येकी 2 गोल
वृत्तसंस्था /पोश्चेफस्ट्रूम, द.आफ्रिका
नवोदित जुगराज सिंगने नोंदवलेली हॅट्ट्रिक व अन्य खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या आधारे भारताने येथे सुरू असलेल्या एफआयएच हॉकी प्रो लीगमधील सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 10-2 अशा गोलफरकाने धुव्वा उडवित दुसरा विजय नोंदवला.
जुगराज सिंगने चौथ्या, सहाव्या व 23 व्या मिनिटाला गोल नोंदवले. तिन्ही गोल त्याने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवले. यामुळे तो सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. याशिवाय हरमनप्रीत (दुसरे मिनिट), अभिषेक (12), गुरसाहिबजित सिंग (24 व 36), दिलप्रीत सिंग (25 व 58), मनदीप सिंग (27) यांनी भारताचे अन्य गोल नोंदवले.
सुरुवातीलाच जोरदार आक्रमण करीत भारताने दक्षिण आफ्रिकन बचावफळी खिळखिळी केली. पहिल्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने मारलेला फटका पुढे सरसावलेल्या कीनन हॉर्नने अडविला. पण दुसऱया प्रयत्नात त्याने जबरदस्त फ्लिक करीत द. आफ्रिकन गोलरक्षक एस्टियान क्रीकला हुलकावणी देत चेंडू जाळय़ात मारला. या गोलने प्रोत्साहित झालेल्या भारतीय संघाने नंतर गोलांची बरसातच सुरू केली. पहिल्या सत्रात त्यांनी आणखी तीन गोल नोंदवले. संघाचा दुसरा व तिसरा गोल जुगराज सिंगने डॅगफ्लिकवर नोंदवले. द.आफ्रिका बचावफळीतील खेळाडूकडून झालेल्या चुकीचा लाभ उठवित अभिषेकने 12 व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल केला. या सत्रात भारताने आठ फटके गोलच्या देशेने मारले तर 65 टक्के बॉल पझेशन मिळवित या सत्रावर पूर्ण वर्चस्व राखले.
दुसऱया सत्रात दक्षिण आफ्रिकेने भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि हॉर्नने सर्कलमधून गोलच्या दिशेने फटका मारला. पण भारतीय बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. भारताच्या आघाडीफळीने रचलेल्या चालीवर लागोपाठ दोन गोल करता आले. जुगराज सिंगने 23 व्या मिनिटाला हॅट्ट्रिक पूर्ण केली.
अभिषेकने मिळविलेल्या पेनल्टी कॉर्नरवर त्याने हा गोल केला तर पुढच्याच मिनिटाला गुरसाहिबजित सिंगने, 25 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने आणि 27 व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल नोंदवत भारताला 8-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मोठी आघाडी मिळाल्यानंतर तिसऱया सत्रात भारताचा वेग कमी झाला.
सुरुवातीला आक्रमण करीत गुरसाहिबजितने वैयक्तिक दुसरा गोल 36 व्या मिनिटाला नोंदवला असला तरी बचावात थोडी ढिलाई आल्यानंतर द.आफ्रिकेने काही संधी निर्माण केल्या आणि भारताने त्यांना तीन पेनल्टी कॉर्नर्स घेण्याची संधी दिली. त्यापैकी एकावर डॅनियल बेलने 44 व्या मिनिटाला श्रीजेशच्या डाव्या बाजूला फटका मारत गोल केला.
पुढच्याच मिनिटाला रिचर्ड पॉट्झने शानदार मैदानी गोल नोंदवत भारताची आघाडी 2-9 अशी कमी केली. शेवटच्या सत्रात 58 व्या मिनिटाला दिलप्रीतने संघाचा दहावा गोल नोंदवून मोठा विजय साकार केला. भारताचा पुढील सामना फ्रान्सविरुद्ध 12 रोजी होणार आहे.