दुसऱया टी-20 सामन्यातही एकतर्फी विजय, रोहित-केएल राहुलची धुवांधार फलंदाजी, पदार्पणवीर हर्षल पटेलचे 25 धावात 2 बळी
रांची / वृत्तसंस्था
केएल राहुल (49 चेंडूत 65) व रोहित शर्मा (36 चेंडूत 55) यांनी 13.2 षटकातच 117 धावांची भरभक्कम शतकी सलामी दिल्यानंतर भारताने न्यूझीलंडचा दुसऱया टी-20 लढतीत देखील एकतर्फी फडशा पाडला आणि 3 सामन्यांची ही टी-20 मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने खिशात घातली. सलग दुसऱयांदा नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने अपेक्षेप्रमाणे न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. न्यूझीलंडने 20 षटकात 6 बाद 153 धावा केल्या तर प्रत्युत्तरात भारताने 17.2 षटकात केवळ 3 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 154 धावांचे तुलनेने आवाक्यातील आव्हान असताना केएल राहुल व रोहित शर्मा ही अनुभवी जोडी किवीज गोलंदाजांवर बरसत राहिली आणि त्यांची चौफेर फटकेबाजी पाहत राहण्याशिवाय पाहुण्या संघाकडे काही पर्याय नव्हता. केएल राहुलने 6 चौकार, 2 षटकारांची तर रोहितने 1 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी करत न्यूझीलंडच्या आव्हानातील हवा काढून घेतली. किवीज संघातर्फे साऊदीने 3 बळी जरुर घेतले. पण, तोवर हा सामना त्यांच्या हातातून निसटला होता.
दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर साऊदीने सुर्यकुमारला देखील बाद केले. पण, रिषभ पंतने आक्रमक फटकेबाजी करत वेंकटेश अय्यरच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. उभय संघातील तिसरी व शेवटची टी-20 उद्या (रविवार दि. 21) कोलकात्यात खेळवली जाणार आहे.
धावफलक
भारत ः केएल राहुल झे. फिलीप्स, गो. साऊदी 65 (49 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), रोहित शर्मा झे. गप्टील, गो. साऊदी 55 (36 चेंडूत 1 चौकार, 5 षटकार), वेंकटेश अय्यर नाबाद 12 (11 चेंडूत 2 चौकार), सुर्यकुमार यादव त्रि. गो. साऊदी 1 (2 चेंडू), रिषभ पंत नाबाद 12 (6 चेंडूत 2 षटकार). अवांतर 10. एकूण 17.2 षटकात 3 बाद 155.
गडी बाद होण्याचा क्रम
1-117 (केएल राहुल, 13.2), 2-135 (रोहित, 15.3), 3-137 (सुर्यकुमार, 15.6).
गोलंदाजी
टीम साऊदी 4-0-16-3, ट्रेंट बोल्ट 4-0-36-0, मिशेल सॅन्टनर 4-0-33-0, ऍडम मिल्ने 3-0-39-0, ईश सोधी 2-0-13-0, जेम्स नीशम 0.2-0-12-0.